शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : गुरूवार, 9 मार्च 2023 (11:55 IST)

गर्भसंस्कार : गर्भावस्थेत असताना मुलं खरंच शिकतात का?

गर्भसंस्कार : गर्भावस्थेत असताना मुलं खरंच शिकतात का?
- सुशीला सिंह
राष्ट्र सेविका समितीशी निगडित असलेल्या संवर्धिनी न्यास या संस्थेने गरोदर महिलांसाठी गर्भ संस्कार अभियानाची सुरुवात केली आहे.
 
राष्ट्र सेविका समिती ही संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला संघटना आहे.
 
पीटीआयच्या बातमीनुसार संवर्धिनी न्यासच्या राष्ट्रीय संयोजक माधुरी मराठे म्हणाल्या, “गरोदर महिलांसाठी गर्भसंस्कार अभियान सुरू करण्यात आलं आहे. म्हणजे गर्भावस्थेत असताना मुलाला संस्कार आणि मुल्यांची शिकवणी मिळेल.”
 
त्यांचं म्हणणं आहे, “स्त्रीरोगतज्ज्ञ, आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि योग प्रशिक्षकांतर्फे न्यासातर्फे एका कार्यक्रमाची योजना तयार केली जात आहे. त्यात गीता आणि रामायणाचे धडे आणि गर्भावस्थेदरम्यान योग यांचा समावेश आहे. म्हणजे गर्भावस्थेत असलेल्या मुलांना संस्कार दिले जातील."
 
राजधानी दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राष्ट्रसेविका समितीतर्फे एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात 12 राज्यातील 80 स्त्रीरोगतज्ज्ञांचा समावेश होता.
 
पीटीआयला माधुरी मराठे यांनी सांगितलं, “हा कार्यक्रम गरोदर महिला आणि मूल दोन वर्षांचं होईपर्यंत सुरू राहील. त्यात गीतेतले अध्याय, रामायणातील कथांचा समावेश असेल. गर्भावस्थेतील मूल 500 शब्द शिकू शकतं.”
 
मात्र गर्भावस्थेतले मूल खरंच शब्द किंवा भाषा शिकू शकतो का?
 
विज्ञानात याबाबत मतमतांतरं आहेत.
 
मुंबईस्थित स्त्रीरोगतज्ज्ञ सुचित्रा देलवी सांगतात की गर्भावस्थेतील मूल आवाज ऐकू शकतो मात्र त्याला कोणतीच भाषा समजू शकत नाही.
 
त्या सांगतात, “जसा जसा गर्भात असलेल्या मुलाच्या शरीराचा विकास होतो, तसेतसे त्याचे कानही विकसित होतात. अशा परिस्थितीत ध्वनी तरंग त्याच्यापर्यंत पोहोचतात. मात्र त्या ध्वनीचा अर्थ त्या मुलाला कळत नाही. अशा परिस्थितीत आई संस्कृतमधील एखादा श्लोक वाचत असेल तर ते त्या लहान मुलाला कसं समजेल?”
 
मतमतांतरं
त्या मानतात की हे एक मिथक आहे आणि त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
 
सुचित्रा देलवी सांगतात की आपण या गोष्टींवर विचार करण्याच्या ऐवजी जी मुलं या जगात आली आहेत त्यांना हव्या असलेल्या मुलभूत गोष्टी जसं अन्न, शिक्षण यांच्याविषयी विचार करायला हवा, त्यांना एक चांगला नागरिक आणि संस्कार देण्याबद्दल बोलायला हवं.
 
त्याचवेळी डॉ. एस.एन. बसू सांगतात की गर्भात वाढणारं मूल स्वप्नं पाहू शकतात आणि त्यांना त्याची जाणीवसुद्धा असते.
 
अमेरिकन वेबसाईट सायकॉलॉजी टुडे वर छापून आलेल्या फीटल सायकॉलॉजीचा उल्लेख करून सांगतात, “यात स्पष्ट लिहिलं आहे ती गर्भ नऊ आठवड्याचा झाल्यावर तो उचकी देऊ शकतो आणि मोठ्या आवाजावर प्रतिक्रिया देऊ शकतो. 13 व्या आठवड्यात तो ऐकूसुद्धा शकतो. तसंच आईच्या आणि परक्या आवाजामध्ये तो फरक ओळखू शकतो.”
 
त्या सांगतात, “या प्रबंधात असं सांगितलं की गर्भावस्थेत असलेल्या मुलाने वारंवार एखादी गोष्ट ऐकली तर तो त्यावर प्रतिक्रिया सुद्धा देतो.”
 
त्या पुढे म्हणतात, “या प्रबंधात असं लिहिलं आहे की गर्भावस्थेत पाहण्या आणि ऐकण्याच्या क्षमतेबरोबरच लक्षात ठेवण्याची क्षमताही विकसित होते. या सगळ्या गोष्टी मौलिक, ऑटोमॅटिक आणि जीवरसायनशास्त्रांशी संबंधित आहे. जसं गर्भ आवाजाच्या आधी दचकतो आणि त्यानंतर प्रतिक्रिया देणं बंद करतो.”
 
त्या सांगतात, “गर्भात मूल विकसित होत आहे. या दरम्यान जर आईने सकारात्मक गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम त्या मुलांवरही होतो.
 
हार्मोन आणि मुलांवर परिणाम
डॉ. सुचित्रा देलवी सांगतात, “जर गरोदर महिला तणावात असेल तर तिला रामायण, गीतेचे श्लोक वाचून शांतता मिळते. एखादं गाणं ऐकून छान वाटतं त्यावेळी तिच्या शरीरात तयार होत असलेल्या हार्मोन्सचा परिणाम गर्भावरही होतो. त्यावेळी तयार होत असलेल्या हार्मोन किंवा रासायनिक संतुलनाचा परिणाम आईवाटे मुलांवर होतो. म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन किंवा हॅप्पी हॉर्मोनचा परिणाम मुलांवरही होतो आणि त्याला वैज्ञानिक आधार आहे.”
 
अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांच्या मते एका गरोदर महिलेसाठी पोषक आहार, चांगले विचार, मन शांत करण्यासाठी गर्भसंस्कार हवेत असं त्यांना वाटतं.
 
त्या सांगतात, “जेव्हा गर्भात असलेल्या मुलाला भाषा समजत नाही तर आई कोणते मंत्र म्हणतेय हे त्याला कसं समजेल?”
 
त्यांच्या मते, “आईचं आनंदी राहणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ती आनंदी रहावी ही कुटुंबाची जबाबदारी असते आणि तिच्या आहारावर लक्ष ठेवायला हवं.
 
विचारधारा बदलण्याचा प्रयत्न
उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठात एक संशोधन सुरू झालं आहे त्यात संगीताचा गर्भावर काय परिणाम होतो हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
बनारस हिंदू विद्यापीठात प्रसुती आणि स्त्रीरोग विभागातील आयुर्वेदिक शाखेतील डॉ. सुनीता सुमन म्हणतात, “आता फक्त सुरुवात आहे. त्यात अधिक माहिती यायला वेळ लागेल. जर आई तणावात असेल तर तिच्यावर अशा प्रकारच्या थेरेपी ने काय प्रभाव पडतो हाही संशोधनाचा उद्देश आहे.
 
काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा एक विशिष्ट विचारधारेच्या प्रसाराचा प्रयत्न आहे.
 
राजकीय विश्लेषक राजेश सिन्हा म्हणतात की हिंदू विचारधारा पुढे आणण्यासाठी असं काहीतरी केलं जातं. भारतात लोकांमध्ये प्रचंड अंधश्रद्धा आहे. तिथे लोक पंचांगांवर जास्त विश्वास ठेवतात.
 
याआधी आरएसएस ची आरोग्य शाखा आरोग्य भारतीतर्फे गर्भ संस्कारांची सुरुवात केल्याच्या बातम्या आल्या होत्या.
 
ही सुरुवात गुजरातपासून झाली होती आणि 2015 पासून राष्ट्रीय स्तरावर नेण्यात आलं. त्याचवेळी संघाच्या विद्या भारती शाखेच्या मार्फत अन्य राज्यात पसरवलं जात आहे.