Keep the house cool घरातील थंडावा कायम राखा!
उन्हाची तलखी वाढली की एसी आणि फ्रजची खरी गरज भासते. पण त्याच दरम्यान नेमका तो बिघडतो आणि पुरती वाट लागते. घामाने डबडबलेल्या अवस्थेत मग एसी मेकॅनिकला बोलावण्याची धावपळ सुरू होते. पण आधीच एसी आणि फ्रीजची काळजी घेतली असती तर उन्हाळ्यातही ते बिनबोभाट काम करतात आणि मग त्याची काळजी करावी लागत नाही. आता एसी योग्य प्रकारे काम करतो आहे की नाही आणि कमीत कमी ऊर्जा घेतोय की नाही, हे पाहण्यासाठी एसी सेट करणे (24 डिग्री हे योग्य परिमाण आहे) गरजेचे आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी बाजारातून एसी खरेदी करण्याचं तुम्ही ठरवलं असेलही पण त्याआधी थोडा मार्केट सर्व्हे करून घ्या म्हणजे झालं. कोणता एसी घ्यावा यावर एकमत न होण्याची शक्यता तशी कमीच. म्हणून एसी खरेदीकरताना काय काळजी घ्यायची आणि एसीची काळजी कशी घ्यायची ते महत्त्वाचे ठरते.
एसीची काळजी
एसी युनिट बंद केल्यानंतरही वातावरणात 15 ते 20 मिनिटे गारवा राहतो. म्हणून टाइम सेट करताना 15 ते 20 मिनिटे पूर्वीचा टायमिंग सेट करावा.
वीज युनिटच्या बचतीसाठी एसी ऑटो किंवा स्लीप मोडवर ठेवावा. एसीचा फिल्टर हा वेळोवेळी साधारण महिन्यातून दोन वेळा साफ करावा.
वीज बचतीकरता एसी हा त्याच्या कम्फर्ट झोनमध्येच असावा. म्हणजेच त्याचे तापमान 24 ते 26 अंशांपर्यंत असावे. 16 अंशांपेक्षा कमी तापमान ठेवू नये, यामुळे वीजपुरवठा जास्त लागतो.
घराच्या खिडक्यांना पडदे लावून खोलीचे सूर्यकिरणांपासून रक्षण करावे. सूर्यकिरणाच्या झोतामुळे एसीला थंडावा निर्माण करण्यास अडथळा निर्माण होतो. एसीचं आऊटडोअर युनिट अडगळीत ठेवू नका. त्याच्याभोवती हवा खेळती राहील याची काळजी घ्या.
उष्णता निर्माण करणार्या वस्तूंना एसी युनिटपासून दूर ठेवा. युनिटच्या फॅनची दिशा योग्य ठेवा. एसीच्या आऊटडोअर युनिटलाही सूर्यकिरणांपासून दूर ठेवा. गरज भासल्यास छप्पर लावा.
फ्रीज साफ करताना
रिकाम्या फ्रीजमधील शेल्फ आणि ड्रॉवरबाहेर काढून थोडीशी साबण पावडर मिसळलेल्या पाण्यात कापड बुडवून पुसून घ्यावं. डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा मिसळलेल्या पाण्यात कापड बुडवावं आणि त्याने फ्रीज साफ करावा.
फ्रीज पुसून झाल्यावर अर्धे कापलेले लिंबू त्यात ठेवावे.
फ्रीज स्वच्छ करताना गरम पाणी, अतिरिक्त साबण पावडर किंवा टोकेरी वस्तू वापरू नयेत. आधी सर्व सामान बाहेर काढून फुकट गेलेली फळं, भाज्या फेकून द्यावीत. गरजेचं सामान सुरक्षित ठिकाणी ठेवणे.
फ्रीज घेताना
फ्रीज नेहमी सपाट जागेवर ठेवावा. उंच सखल भागावर तो हलता राहिल्यास त्याचा कॉम्प्रेसर खराब होण्याची शक्यता असते.
फ्रीजमध्ये कधीही गरम पदार्थ ठेवू नये. गरम पदार्थामुळे कॉम्प्रेसरवर दबाव येऊन फ्रीजची क्षमता कमी होते व फ्रीजमध्ये जीवाणू वाढून इतर पदार्थ खराब होण्याची शक्यता असते.
फ्रीज भिंतीपासून 5-6 इंच आणि गॅसपासून 6 फूट लांब ठेवावा किंवा हवेशीर जागेवर ठेवावा. कारण कॉम्प्रेसरमधून येणारी गरम हवा खेळती राहिली नाहीतर पुन्हा येणार्या हवेमुळे उष्णता काढून त्याचा परिणाम फ्रीजच्या तापमानावर होतो.
फ्रीजचालू असताना त्याचा दरवाजा 20-25 सेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये. दरवाजा जास्त वेळ उघडा राहिल्यास फ्रीजच्या आतील तापमानात वाढ होऊन कॉम्प्रेसर थंडावा मिळवण्यासाठी जास्त वेळ घेतो त्यामुळे वीज बीलही वाढते.