1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

बाळाच्या गर्भनाळेतलं रक्त का साठवलं जातं? त्यासाठी किती खर्च येतो?

- पेडागाडी राजेश
दक्षिणतेला स्टार अभिनेता रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांना नुकतंच हैद्राबादमधल्या ज्युबिली हॉस्पिटलमध्ये बाळ झालं.
 
यानंतर उपासनाने ट्वीट करत म्हटलं की नवजात बाळाच्या गर्भनाळेतलं रक्त साठवण्यात आलंय.
 
बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि शिल्पा शेट्टी, तसंच नम्रता शिरोडकर यांनी आपल्या बाळांच्या जन्माच्या वेळी गर्भनाळेतलं रक्त गोठवलं होतं.
 
पण असं करण्याचं कारण काय आणि ते करायला किती खर्च येतो जाणून घेऊया.
 
गर्भनाळ म्हणजे काय?
जन्माच्या वेळी नवजात बाळ आईशी नाळेद्वारे जोडलेलं असतं. ही नाळ आईच्या प्लॅसेंटाला जोडलेली असते. नाळेचं एक टोक गर्भपिशवीला (प्लॅसेंटा) तर दुसरं टोक बाळाच्या बेंबीला जोडलेलं असतं.
 
याच नाळेव्दारे बाळाला आईच्या पोटात असताना ऑक्सिजन आणि ग्लुकोज मिळतं.
 
गर्भनाळेत दोन रक्तवाहिन्या असतात. धमनी आणि शिर. धमनी बाळापर्यंत ऑक्सिजन आणि ग्लुकोज पोचवते तर शिर बाळाच्या शरीरातला कार्बनडाय ऑक्साईड आणि क्षार बाहेर आईच्या शरीरात नेते.
 
बाळ जन्माच्या वेळीही आईशी नाळेने जोडलेलं असतं.
 
सर्वसाधारणपणे बाळाला प्लॅसेंटापासून वेगळं करण्यासाठी गर्भनाळेला बांधून ती कापतात. जागतिक आरोग्य संघटनेनेनुसार कॉर्ड क्लॅपिंगसाठी साधारणपणे 60 सेकंदांचा वेळ घेतला जातो. याला 'अर्ली कॉर्ड क्लॅम्पिंग' म्हणतात. मात्र, बरेचदा यासाठी 60 सेकंदांपेक्षा जास्त वेळही लागतो. त्याला 'डिलेड कॉर्ड क्लॅम्पिंग' असं म्हणतात.
 
गर्भनाळ कापल्यानंतर एक लहानसा भाग बाळाच्या बेंबीला तसाच रहातो, पण जन्मानंतर 15 दिवसांनी नाळेचा तो भाग काळा पडून सुकतो आणि बाळाच्या शरीरापासून आपोआप पडून जातो.
 
गर्भनाळेतलं रक्त का महत्त्वाचं?
बाळाची नाळ कापल्यानंतरही त्यात काही रक्त शिल्लक असतं. याला ‘कॉर्ड ब्लड’ असं म्हणतात.
 
आधी बाळाची अशी कापलेली नाळ म्हणजे बायोजैविक कचरा आहे असं समजत होते पण आता रिसर्चमधून असं समोर आलंय की या नाळेतल्या रक्तात हिमॅटोपॅटिक स्टेम सेल्स (HSC) किंवा हिमॅटोपॅटिक प्रोजेनेटर सेल्स (HPC) असतात. अशाच प्रकारच्या पेशी मानवी हाडांमध्येही असतात.
 
स्टेम सेल्स काय करतात?
गर्भनाळेतल्या रक्तातल्या स्टेम सेल्स जतन करणं याला ‘कॉर्ड ब्लड बँकिंग’ असं म्हणतात.
 
द अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्स (AAP) च्या मते अशा प्रकारच्या स्टेम सेल जतन करून ठेवल्या तर भविष्यात होणाऱ्या काही आजारांवर उपचार म्हणून वापरल्या जाऊ शकतात.
 
ल्युकेमिया (रक्ताचा कॅन्सर) थॅलेसेमिया, सिकल सेल अनिमिया, लिंफोमा अशा आजारांवर उपचार करताना या स्टेम सेल्सचा वापर करता येतो.
 
स्टेम सेल्स जतन कशा केल्या जातात?
प्लॅसेंटा आणि गर्भनाळेतलं रक्त जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर प्रयोगशाळेत आणलं जातं. त्याच्या योग्य त्या चाचण्या केल्या जातात आणि मग द्रव नायट्रोजनच्या टँकमध्ये हे रक्त गोठवलं जातं.
 
नाळेतलं रक्त गोठवून ठेवताना प्लास्मा डिप्लेशन हे तंत्रज्ञान वापरलं जातं. म्हणजे रक्तातला प्लास्मा काढून घेतला जातो.
 
याला खर्च किती?
प्रत्येक संस्थेत यासाठी वेगवेगळा खर्च येतो. त्याचबरोबरीने तुम्हाला किती वर्षांसाठी स्टेम सेल्स साठवून ठेवायच्या आहेत यावर खर्च अवलंबून असतो.
 
उदाहरणार्थ 25 वर्षांसाठी स्टेम सेल साठवण्यासाठी स्टेम साईट कंपनी 55 हजार रुपये घेते तर 75 वर्षं जतन करण्यासाठी जवळपास 70 हजार रुपये खर्च येऊ शकतो.
 
या ट्रीटमेंटचा इन्शुरन्सही काढता येतो.
 
गर्भनाळेतलं रक्त दान करता येतं का?
द अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्स (AAP) म्हणतात की गर्भनाळेतलं रक्त गोठवण्यापेक्षा ते दान करावं. कारण या रक्तात इतर रक्तपेशींना बदलण्याची ताकद असते त्यामुळे रक्तासंबंधी आजारांवर तसंच इम्युनोडिफिशिएन्सीज, मेटाबॉलिक डिसीझ आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये याचा उपचार म्हणून वापर करता येऊ शकतो.
 
याचे काही साईड इफेक्ट आहेत का?
गर्भनाळेतलं रक्त उपचारांमध्ये वापरण्याचे काही साईड इफेक्ट नाहीत असं डॉ. प्रतिभा लक्ष्मी म्हणतात.
 
“हे रक्त प्लॅसेंटा आणि गर्भनाळेतून काढलेलं असतं त्यामुळे त्याचे काही साईड इफेक्ट नसतात,” असं त्या म्हणतात.
 
डॉ पी श्रिशा याला दुजोरा देतात.
 
पण त्या म्हणतात, “गेल्या काही वर्षांत गर्भनाळेतून काढलेल्या पेशींमुळे एखाद्या व्यक्तीचा मोठा रोग बरा झाला आहे असं दिसून आलेलं नाही. कदाचित एक किंवा दोन व्यक्तींना याचा फायदा झालेला असू शकेल. पण अनेकांच्या केसमध्ये हा फक्त व्यवसाय करण्याचा आणि पैसे कमवण्याचा एक मार्ग झालेला आहे.”
 
डॉ प्रतिभा लक्ष्मीही याच मताच्या आहेत. त्या म्हणतात, “भावंडं असतील आणि त्यांना आजार असतील तर त्यांच्या उपचारांमध्ये कदाचित या स्टेम सेल्सचा उपयोग होऊ शकतो. पण ते वगळता त्याचा विशेष फायदा नाही. रक्तासंबंधीचे आजार तसे दुर्मिळ आहेत. स्टेम सेल गोठवण्याचा क्वचित फायदा झाला तरी त्यावर जेवढा खर्च होतो त्यातुलनेत काहीच नाही.