1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

तुम्ही खात असलेल्या पदार्थांमुळे गर्भधारणेवर परिणाम होतो का?

- जेसिका मडिट
मूल व्हावं म्हणून प्रयत्न करणारे स्त्री-पुरुष वैद्यकीय सल्ल्याखेरीज अनेक इतर उपायही करतात. त्यात अमूक एक पदार्थ खाल्ल्याने गर्भधारणा होते किंवा अमूक खाल्ल्याने गर्भ राहात नाही असे अनेक समज आपल्याकडे असतात.
 
गर्भधारणा आणि आहाराचा संबंध आपल्याकडच्या परंपरागत घरगुती उपायांमध्ये खूप पूर्वीपासून जोडला गेला आहे. पण या संबंधाकडे पाश्चिमात्य जग कसं पाहतं? तिथे या संदर्भात आधुनिक वैद्यकीय जगतामध्ये काय बोललं जातं यावर प्रकाश टाकणार BBC Future चा हा लेख -
 
मूल होण्यासाठी तुम्ही खात असलेलं अन्न महत्त्वाची भूमिका बजावतं. योग्य आहार घेतला तर गरोदर राहण्याची शक्यता वाढते का? कशी? काय खावं, काय टाळावं? काय आहेत नियम आणि काय आहे यातलं तथ्य?
 
हल्ली ऑनलाइन फर्टिलिटी चॅटरूम्स असतात जिथे गरोदर मातांच्या आरोग्याबाबतच्या शंकांना उत्तरं दिली जातात आणि मूल होण्यासंदर्भातल्या उपायांवरही चर्चा होते, हे कदाचित तुम्हाला माहीत असेल.
 
तर अशा ऑनलॉइन चॅटरूम्समध्ये सतत चघळला जाणारा विषय म्हणजे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढावी यासाठी योग्य आहार कोणता?
 
फर्टिलिटी बूस्टिंग सप्लीमेंट्स नावाने काही पदार्थ अगोदरच प्रचलित आहेत. त्यांची जाहिरातही होत असते. गरोदरपणात स्त्रीचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी ठराविक पदार्थ तिला खायचा सल्ला दिला जातो.
 
या सगळ्या जाहिरातबाजीत आणि सांगोवांगी मिळालेल्या माहितीत खरंच किती तथ्य आहे? पुरुष आणि स्त्रीची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी मदत करणारा असा खराच काही आहार शास्त्रीयदृष्ट्या ठरवलेला आहे का? गर्भाच्या वाढीस पोषक पदार्थ कोणते?
 
सर्वात अगोदर हेल्दी प्रेग्नन्सीचा विचार करू या. गर्भवाढीसाठी काही पोषकद्रव्य स्त्रीच्या शरीरात असणं फायदेशीर असतं. उदाहरणार्थ फॉलिक अॅसिड. गर्भधारणेआधी आणि गरोदरपणात फॉलिक अॅसिड घेतलं तर एननसेफली किंवा अमस्तिष्कता (मेंदूची अपुरी वाढ) हा जन्मदोष बाळात येण्यास प्रतिबंध होतो. स्पायना बिफिडा किंवा पाठीचा कणा अपुरा असण्याचा जन्मदोषसुद्धा बाळामध्ये येण्याची शक्यता फॉलिक अॅसिडमुळे कमी होते.
 
हे दोन्ही जन्मदोष भ्रूण अगदी लहान असतानाच गर्भधारणेच्या सुरुवातीलाच निर्माण होतात. त्यामुळे स्त्रीला ती गरोदर असल्याचं लक्षात येण्याअगोदरच भ्रूण या दोषाला बळी पडलं.
 
त्यामुळे अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीझ कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने सर्वच स्त्रियांनी पुनरुत्पादनाच्या वयात 400मायक्रोग्रॅम एवढं फॉलिक अॅसिड रोज घ्यावं असा सल्ला दिला आहे.
 
फॉलिक अॅसिडयुक्त सीरिअल्सच्या सेवनामुळे शरीरात ही कमतरता राहणार नाही. त्यामुळे अनप्लॅण्ड प्रेग्नन्सीमध्येसुद्धा जन्मदोषाची शक्यता कमी करता येईल. 2019 मध्ये जगभरातल्या 22 टक्के बाळांना या दोन्ही जन्मदोषांपासून वाचवण्यात यश आलं याचं श्रेय या फोर्टिफिकेशनला देण्यात येत आहे.
 
फॉलिक अॅसिडचे आणखीही काही फायदे आहेत. मूल व्हावं म्हणून प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांनी हे घेतलं तर गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. अर्थात या निष्कर्षाच्या पुष्टीसाठी आणखी काही प्रयोग आणि ट्रायल्स होणं बाकी आहे.
 
फॉलिक अॅसिडविषयी समजलं आता बाकीच्या आहार आणि सप्लिमेंट्सचं काय? फर्टिलिटी डाएट नावाच्या गोष्टीत खरंच काही अर्थ आहे का? ते खाल्ल्याने मूल व्हायची शक्यता खरंच वाढते का?
 
IVF द्वारे गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडीदारांचा एक अभ्यास केला गेला. त्यात असं दिसून आलं की, पुरुषांचा आहारही गर्भधारणेसाठी महत्त्वाचा असतो. विशेषतः मांसाहारी पुरुषांबाबत अभ्यासात माहिती समोर आली. पुरुष कुठं मांस खातो यावर बरंच काही अवलंबून असतं.
 
आता हा संबंध जाणून घेण्याअगोदर मुळात गर्भधारणेची प्रक्रिया मुळातून समजून घेतली पाहिजे. अमेरिकेत वंध्यत्वाचं प्रमाण वाढत आहे. तिथे एक वर्षं नैसर्गिकरीत्या प्रयत्न करूनही मूल होऊ न शकणाऱ्या दांपत्यांचं प्रमाण 15 टक्के आहे. आता यामागची कारणं काय?
 
स्त्रियांच्या बाबतीत कदाचित गर्भधारणा न होण्यामागे हेल्दी एग्ज तयार होऊ न शकणं हे कारण असू शकतं. अंडाशय बीजांड तयार करण्यास सक्षम नसणं किंवा बीजांडाचा प्रवास अंडाशयातून गर्भाशयापर्यंत होण्यात अडचण निर्माण होऊ शकते.
 
उदाहरणार्थ फॅलोपियन ट्यूब ब्लॉक झाल्याने गर्भधारणा नैसर्गिकरीत्या होऊ शकत नाही. अगदी बीजांडाने गर्भाशयापर्यंतचा प्रवास पूर्ण केलाच ती गर्भाच्या अस्तराला ते चिकटून राहण्यात अपयशी ठरतं किंवा तिथे पोहोचूनही ते जगू शकत नाही.
 
पुरुषांच्या बाबतीत गर्भधारणा होऊ न शकण्याच्या कारणांमध्ये सर्वांत महत्त्वाचं आहे स्पर्म सेल्सची गुणवत्ता. यामध्ये स्पर्म किती वेगवान हालचाली करतात, त्यांचा आकार आणि माप आणि ठराविक सीमेनमध्ये असलेली स्पर्मची संख्या या सगळ्याचा समावेश आहे.
 
स्पर्म क्वालिटीला धोका आणणारे अनेक घटक असू शकतात. अगदी पर्यावरणातलं प्रदूषणसुद्धा स्पर्मच्या गुणवत्तेवर परिणाम करतं. चाचण्यांनंतरही अनेक वेळा वंध्यत्वाचं कारण स्पष्ट होऊ शकत नाही. 15 टक्के पुरुषांमधल्या वंध्यत्वाचं कारण सांगता येत नाही.
 
एखाद्या सप्लीमेंटमुळे किंवा ठराविक आहाराने वंध्यत्वावर मात करता येते असं धडधडीतपणे सांगता येत नाही. पण गर्भधारणेसाठी आणि नंतरही योग्य आहार उपयुक्त असतो, असं तज्ज्ञ सांगतात.
 
सगळ्यात महत्त्वाचं तर आवश्यक जीवनसत्त्व मिळालीच पाहिजेत. अपुरा आहारा आणि अयोग्य आहाराने कुपोषण झालं तर पालकांच्या प्रकृतीलाच ते धोकादायक ठरू शकतं त्यानंतर होणाऱ्या मुलाचा विचार करता येईल.
 
यासाठी एक उदाहरण देता येईल. डच हंगर विंटर नावाने कुप्रसिद्ध असलेल्या 1944 सालच्या आठ महिन्यांच्या दुष्काळ काळात जन्मलेल्या बाळांना अनेक समस्यांना तोंड द्यायला लागलं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काळात नाझी सैन्याने नेदरलँड्सला होणारा अन्नपुरवठा थांबवला होता.
 
त्यामुळे या 8 महिन्यांच्या काळात संपूर्ण देशभर अन्नधान्याची टंचाई होती. या काळात गरोदर असणाऱ्या स्त्रियांना दिवशभरात फक्त 400 कॅलरीएवढाच आहार मिळत होता. त्यामुळे अशा कुपोषित मातांना गरोदरणात त्रास झालाच पण या काळात जन्माला आलेल्या मुलांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागलं.
 
बारिक आणि बुटकी बालकं जन्माला आली. अनेकांच्या डोक्याच्या भागाचा विकास झाला नव्हता. त्यातून वाचलेल्या बालकांना मोठेपणी लठ्ठपणा, मधुमेह आणि स्किझोफ्रेनिया यासारखे आजार तुलनेने कमी वयात जडले. अनेकांचे तारुण्यातच मृत्यूही झाले.
 
आता ज्यांना पुरेसा आहार मिळतो अशा पालकांसाठीही तो पोषक आहे ना आणि आवश्यक जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहे ना हे महत्त्वाचं असतं. वंध्यत्वाचा विचार करताना नेहमी स्त्रियांच्या आहाराविषयी बोललं जातं पण पुरुषांच्या प्रजननक्षमतेवरसुद्धा ते घेत असलेला आहार परिणाम करत असतो.
 
2015 मध्ये एक अभ्यास केला गेला. IVF च्या मदतीने गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या स्त्रीपुरुषांच्या आहाराबद्दल हा अभ्यास होता. बहुतांश मांसाहार घेणाऱ्या जोडीदारांचा यात प्रामुख्याने विचार झाला. कुठल्या प्रकारचं मांस पुरुष खाताहेत आणि त्याचा प्रजननक्षमतेवर कसा आणि किती परिणाम होतो हे यातून स्पष्ट झालं.
 
अधिक प्रमाणात चिकन खाणाऱ्या पुरुषांची प्रजननक्षमता अधिक होती असं दिसली. याउलट आहारात बेकन किंवा सॉसेजेस म्हणजे प्रोसेस्ड मीट अर्थात प्रक्रिया केलेलं मांस अधिक असणाऱ्या पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम दिसत होता. जे पुरुष आठवड्याभरात 1.5 प्लेट एवढंच प्रोसेस्ड मीट खात होते त्यांच्या पार्टनरची गर्भधारणेची शक्यता 82 टक्क्यांपर्यंत होती. तर जे त्याहून अधिक म्हणजे 4.3 सर्व्हिंग्ज एवढं प्रक्रिया केलेलं मांस दर आठवड्याला खात होते त्यांच्या पार्टनरची गर्भधारणेची क्षमता 54 टक्क्यांवर आलेली होती.
 
प्रत्यक्ष गर्भधारणा झाल्यानंतरही पुरुषांच्या आहाराचा त्यांना होणाऱ्या बाळाच्या तब्येतीवर म्हणजे गर्भावर परिणाम होत असतो.
 
ऑस्ट्रेलियातल्या युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडमध्ये यासंदर्भात एक संशोधन करण्यात आलं. संशोधन पथकाने मूल होऊ इच्छित असलेल्या 200 जोड्यांच्या आहाराचा अभ्यास केला. ब्रिस्बेनमधल्या एका मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये आलेल्या केसेसचा हा अभ्यास होता.
 
हे ऑस्ट्रेलियातलं सर्वांत मोठं प्रसूतीगृह आहे. अभ्यासात असं आढळून आलं की, पुरुषांच्या आहाराचा स्त्रीच्या आहारावर मोठा प्रभाव पडतो आणि त्याचा परिणाम विकसित होत असलेल्या गर्भावर होत राहतो. इतर काही संशोधनांतूनही असं सूचित झालं आहे की, वडिलांच्या वजनाचा मुलाच्या वजनावर परिणाम होऊ शकतो आणि हा पिढीजात परिणाम असतो.
 
क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीच्या या अभ्यासाचा भाग असलेल्या आणि शोधनिबंधांच्या लेखकांपैकी एक शेली विल्किनसन सांगतात, "पुरुषांच्या आहाराचा, त्यांच्या आरोग्याचा प्रजननक्षमतेवर होणारा परिणाम बऱ्याच वेळा दुर्लक्षित राहतो. खरं तर हा खूप महत्त्वाचा भाग आहे." शेली या आहारतज्ज्ञ असून सध्या ऑस्ट्रेलियातल्या एका खासगी मॅटर्निटीमध्ये फर्टिलिटी सपोर्टमधल्या तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. "खरं तर पुरुषांचा आहार त्यांच्या होणाऱ्या बाळांच्याच नव्हे तर त्यांच्या बाळांच्या म्हणजे नातवांच्या आरोग्यावरही परिणाम करणारा असतो", असंही त्या सांगतात.
 
कुठलाही बदल स्वीकारणं किंवा नाकारणं यात जोडीदाराच्या साथीचा वाटा मोठा असल्याचंही शेली सांगतात. "जोडीतल्या एखाद्याने आरोग्यपूर्ण आहाराची मार्गदर्शक तत्त्व अंगिकारली तर दुसरा ती आपोआप किंवा सहज स्वीकारतो. आपण स्त्रियांनाच नव्हे तर पुरुषांनाही त्यांच्या जीवनशैलीत योग्य बदल करण्यास प्रवृत्त करायला हवं. नाहीतर आपण अर्धी लढाई हरण्याची शक्यता तिथेच आहे."
 
बदल कोणते?
आहारातल्या सुयोग्य बदलाचा विचार करता एक उपयुक्त बदल नक्कीच करता येईल. आहारातला फॅट कंटेण्ट म्हणजे स्निग्धांश वाढवणे. फक्त स्त्री-पुरुष दोघांनीही ते कुठल्या प्रकारचे फॅट््स खाताहेत याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
 
सुकामेवा, बिया, अॅव्होकॅडो, ऑलिव्ह ऑइल, सालमन फिश यामध्ये चांगले फॅट्स असतात. परंतु ट्रान्सफॅट्सयुक्त पदार्थ टाळायला हवेत. ट्रान्सफॅट्स नैसर्गिकरीत्या आहारात येतात किंवा अकृत्रिम पद्धतीने केलेल्या प्रक्रियेतून निर्माण होतात.
 
मार्गारिन, बेकरी प्रॉडक्ट्स, तळलेले पदार्थ, डोनट्स अशा प्रक्रिया केलेल्या अन्नातून ट्रान्सफॅट्स पोटात जातात आणि त्याचा गर्भधारणेवर वाईट परिणाम होतो.
 
शाकाहारी पदार्थ प्रजननक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी 18 हजार 555 स्त्रियांच्या आहाराचं आठ वर्षांहून अधिक काळ निरीक्षण केलं. या स्त्रिया गर्भधारणेची प्रतीक्षा करणाऱ्या किंवा गरोदर होत्या. रेड मीटऐवजी वनस्पतींतून मिळणारे लेग्युम्स खाल्ले तर अंडाशयाच्या गुंतागुंतीमुळे येणारं वंधत्व टाळण्याची शक्यता 50 टक्क्याने वाढते, असं या निरीक्षणातून समोर आलं.
 
स्त्रियांची प्रजननक्षमता आणि आहार यांच्यातला संबंध शोधणाऱ्या एका 2021 च्या संशोधनाचे अभ्यासक सांगतात, "स्त्रियांच्या आहाराकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहेच. पण स्त्री-पुरुष दोघांच्याही पोषण आणि आहाराचा दोघांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होते हे निर्विवाद आहे."
 
पोषकद्रव्य आणि आहार यांचा प्रजननाच्या दृष्टीने अभ्यास यात करण्यात आला. जे स्त्री-पुरुष मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी त्यांच्या उपचारांमध्ये क्लिनिकल डाएटिशियनचा समावेश करणं आवश्यक आहे, असा सल्ला हे संशोधक देतात.
 
त्यांच्या निष्कर्षाचा मथितार्थ असा की, स्त्री-पुरुष दोघांनीही आहारात भरपूर भाज्या, फळं, तृणधान्य आणि हेल्दीफॅट्स असणारे पदार्थ म्हणजे ऑइली फिश, लेग्युम्स, अंडी आणि स्निग्धांश कमी असेलेले मांसाहारी पदार्थ यांचं सेवन केलं पाहिजे.
 
बऱ्याचदा दुर्लक्षित राहणारी काही आवश्यक पोषकद्रव्य पुरेशा प्रमाणात जातायत ना याकडेही लक्ष देण्याची गरज या संशोधनाच्या निष्कर्षांमध्ये नोंदवली गेली. उदाहरणार्थ आयोडिन, ज्याची गर्भाच्या योग्य वाढीसाठी नितांत आवश्यकता असते. होणाऱ्या आईच्या थायरॉइड फंक्शनसाठीही ते आवश्यक असतं.
 
दारूसाठी तर थेट सूचना संशोधनात अनेक ठिकाणी नोंदवली गेली आहे. "गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करत असाल किंवा प्रेग्नंट असाल तर अमूक प्रमाणातच मद्य घेणं चांगलं असं कुठलंही सेफ प्रमाण नाही. थोडक्यात मद्य पूर्णपणे वर्ज्यच करणं योग्य." सर्व प्रकारच्या अल्कोहोलसाठी - यामध्ये वाइन आणि बीअरही आली... ही सूचना देण्यात आलेली आहे.
 
तुम्हाला तुमच्या आहाराविषयी किंवा त्याचा परिणाम प्रजननक्षमतेवर कसा होईल याविषयी काही शंका असेल तर डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. काही अन्नपदार्थांचा आणि घटकांचा प्रजननक्षमतेवर चांगला परिणाम होतो हे खरं असलं तरी त्याचा अतिरेक टाळावा.
 
किंवा त्यावरचं अवलंबून राहू नये. वंध्यत्व ही गुंतागुंतीची समस्या आहे. त्याची कारणंही तितकीच गुंतागुंतीची आहेत. एखाद्याच्या आहाराबद्दल अतिकाळजीसुद्धा त्या दृष्टीने स्ट्रेस वाढवणारी आणि त्यामुळे घातकच ठरू शकते.
 
या अतिकाळजीमुळे अपराधीपणाची भावना किंवा स्वतःला दोष देण्याची शक्यता वाढू शकते. एखादी गोष्ट आपण खाल्ली किंवा खाल्ली नाही यामुळे आपल्याला ही समस्या निर्माण झाली याची शक्यता अजिबात नाही, हे मूल होण्याची आस धरून बसलेल्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
 
मूल व्हावं म्हणून प्रयत्न करणारे स्त्री-पुरुष नेहमी अशा एखाद्याच अन्नपदार्थांच्या शोधात असतात ज्याने जादू घडावी तसा परिणाम साधेल असं त्यांना वाटतं. अशा फर्टिलिटी फूडच्या नादी न लागता संपूर्ण आरोग्यपूर्ण आहाराकडे लक्ष देणं अधिक फायदेशीर ठरेल, असं शेली सांगतात.
 
"सध्या फर्टिलिटी चॅटरूम्स किंवा सगळ्याच वंधत्व निवारण केंद्रात अननसाचा बोलबाला मॅजिक फर्टिलिटी फूड म्हणून झालेला दिसतो. तुम्हाला मूल व्हावं असं वाटतंय ना, अननस खा, अशी काही ती जादू नाही. कुठल्याही एकाच पदार्थात अशी क्षमता नसते", असंही त्या स्पष्ट करतात.
 
*या लेखात दिला गेलेला मजकूर केवळ सर्वसाधारण माहितीच्या हेतूने दिलेला आहे. वैद्यकीय सल्ल्याला पर्याय म्हणून याचा वापर करू नका. आरोग्यतज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच कुठलाही उपाय करा.