1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (12:14 IST)

विनोदी कथा..स्मार्टफोनच्या नादी लागलेल्या आजोबांची

funny story
आमचे एक शेजारी होते...
वय वर्षे पंच्याऐंशीं ते नव्वद....
मात्र स्मार्टफोन अगदी एखाद्या तरुणाला लाजवतील, इतक्या सफाईने वापरीत. 
गेली पाच वर्षे काका अंथरूणावरच बेडरीडन होते. 
छंद फक्त एकच. स्मार्टफोन. 
हल्ली त्यांना फेसबुकचा नाद लागला होता. 
दर तासाला स्टेटस अपडेट करायचे. 
स्टेटस तरी काय?? 
बीपी अमुक,.. शुगर तमुक, ...
झोपल्या-झोपल्या काकांनी अनेक विविध क्षेत्रातले आभासी मित्र जोडले होते...
 
डॉक्टर, वकील, इंजिनियर, इतकंच काय तर 
मृत-सामग्री केंद्राचे मालक, वैकुंठ रथाचे ड्रायवर, 
तेरा दिवसांचे काँट्रॅक्ट घेणारे, सर्व उपयोगी क्षेत्रातले लोक काकांचे आभासी मित्र होते..
रोज सकाळी मेसेंजर वर मेसेज यायचे..
"तैयारीकू लगू क्या?? "
काका त्यांना, "वेट अँड वॉच.." चा सल्ला द्यायचे..
 
एक मात्र विशेष मैत्रीण भेटली होती काकांना..
त्यांच्या प्रत्येक स्टेटस वर कॉमेंट करणारी..
शब्द संपले की, ती एखाद्या पायाच्या नखाने जमीन कुरतडणाऱ्या मांजरीचा फोटो टाकायची..
उत्तरादाखल काका टाळ्या पिटणारं माकड टाकायचे..
काकुला वाटायचं, आपल्याला माकड म्हणतो हा थेरडा. 
ती वस्सकन फेंदारलेल्या मिश्यांची मांजर टाकायची..
एकंदरीत काय, यमराजाची वाट पाहणं सुकर झालं होतं फेसबुकमुळे..
 
आणि एक दिवस..
साक्षात यामराजाची फ्रेंड रिक्वेस्ट आली.
रेड्याचा व्हाट्सअप्प वर मेसेज आला.. 
"कमिंग टुडे..आवरतं घ्या.."
आदल्या रात्रीच काकांचं फोरजी बंद पडलं..
नियतीचे संकेत काकांना समजले.. 
रात्रभर बायको, मुलगा आणि सून..
गंगाजल घेऊन बाजूला बसले होते..
काका शेवटचं स्टेटस अपडेट करत होते..
"आम्ही जातो आमुच्या गावा.."
सकाळी सकाळी काका गेले...
क्रियाकर्म आटोपले. ...
 
पिंडदानाचा दिवस आला.
दोन कावळे हजर होते. पण पिंडाला एकही शिवेना...
काकांच्या सर्व इच्छा पुरवायचे वचन दिल्या गेले,
पण कावळे अगदी ढिम्म...
सुनांनी त्यांना "सासूबाईंचा दर्जा देऊ.." हे मान्य केलं,
पण कावळे आपले हूं नाही की चुं नाही..
सगळे वैतागले. इतक्या समृद्ध माणसाचं मन कशात अडकलं असेल, समजायला मार्ग नव्हता..
शेवटी काकांचा नातू आला आणि म्हणाला,
आजोबा, तुमच्या अंतिम पोस्टला एकशे साठ लाइक आले, आणि मुख्य म्हणजे तुमची
बेस्ट फ्रेंड आजी ची कॉमेंट पण आली, Coming Soon, B Happy अशी...
आणि काय आश्चर्य???
कावळ्यांचे अख्खे खानदान पिंडावर तुटून पडले हो..