शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (11:52 IST)

तू बोलत नाहीस...

माणसं 'बोलायचं' थांबली याचा अर्थ 'व्यक्त' व्हायचच थांबली, असं नाही.
तू बोलत नाहीस...
 
कालपरवाच आमच्या एका व्हाट्सअप समुहावर एका सदस्याचा अचानक एक संदेश पडला," आज काल तू बोलत नाहीस, सगळं मनातच ठेवतेस.."
 
'संदेश चुकून या समुहावर टाकला गेला', असं म्हणून त्या सदस्याने तो काढूनही टाकला. पण ते वाक्य तोवर त्या समुहातल्या बऱ्याच मंडळी च्या हृदयाला स्पर्श करून गेले असणार यात शंका नाही.
 
खरंच, 'ती' का बरं बोलत नाही?
 
खरं सांगायचं तर स्त्री असो वा पुरुष, मनातल्या मनात एक अखंड संवाद सुरूच असतो, स्वतःशीही आणि इतरांशीही. पण त्या संवादातलं फारच थोडं प्रत्यक्षात ओठावर येतं. तोलून-मापून, विचार-प्रतिविचार करून, होणार्या परिणामांचं भान ठेऊनच शब्द बाहेर पडतात. 
 
अर्थात अपवाद असतातच. माझी एक मैत्रिण तिला अधूनमधून थांबवावं लागायचं, इतकं अखंड आणि भरधाव बोलायची, त्यात तोलून -मापून वगैरे काही नसायचं. तिच्या घरातल्या मंडळींनाही त्या प्रवाहातलं 'मुद्द्याचं तेवढं' घ्यायची सवय झालेली. या मैत्रिणीला एका न्यूरोलॉजिकल आजाराने अचानक ग्रासलं आणि धबधब्याचं पाणी आटुन धार क्षीण होत जावी तसे तिचे शब्द हळूहळू नाहीसे होत गेले. आता 'ती बोलत नाही'. कधीतरी एखादा शब्द तिच्या डोळ्यात ऊमटल्याचा भास होतो आणि वाटतं कि कदाचित तिचा 'आतला संवाद' अजूनही सुरू असावा, पण तिच्या घरात मात्र आता भयाण शांतता असते.
 
संवाद साधणं किती गरजेचं असतं नं! आपण कधीकधी ओठांपर्यंत आलेले शब्द गिळून टाकतो.. संताप, असहायता, दुःख आणि क्वचित आनंदही शब्दात व्यक्त करणं नाही जमत. बरेचदा आपण गृहितही धरतो की व्यक्त झालो तरी 'मला नक्की काय होतंय, काय वाटतंय, काय सांगायचय' हे नाहीच कळणार समोरच्याला, मग बोलून काय उपयोग! मग सुरू होते एक विचित्र घुसमट.. 
 
आमच्या नात्यातल्या एक बाई मनाविरुद्ध काही घडलं की फक्त रडायच्या, बाकी तोंडातून एक चकार शब्द नाही. नवरा वैतागायचा," ही काही बोलली तर आम्हाला कळेल नं की हिला काय हवय, नुसती आपली रडत राहते!" बाईंचं पुर्वायुष्य कठीण परिस्थितीत गेलेलं, त्यामुळे दुःख ओठांऐवजी डोळ्यातून बाहेर पडायची सवय लागली ती खरतरं तेव्हाचीच.
 
काही मंडळींचा मात्र मूळ स्वभावच अबोल असतो. अशांविषयी 'ती जास्त बोलत नाही, शिष्ठच आहे ' इथपासून ते 'अगदी लाजाळूचं पान आहे' किंवा 'पक्की आतल्या गाठीची आहे ती, बरोब्बर तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसते' अशी विविध प्रकारची मतं बनवली जातात. 
 
पण नीट लक्ष दिलं तर कळतं कि ही मंडळीही भरभरून बोलत असतात. ती कधी त्यांनी काढलेल्या रांगोळीतून बोलतात, कधी त्यांच्या लिखाणातून बोलतात, अगदी त्यांनी केलेल्या घरातल्या पडद्यांवरच्या आणि उशांच्या अभ्य्रांवरच्या भरतकामातूनही बोलतात!
 
माझ्याकडे एक अशाच मितभाषी स्वयंपाकाच्या मावशी होत्या. अतिशय निगुतीने आणि नजाकतीने अप्रतिम स्वयंपाक करायच्या. पीठ मळताना, भाज्या चिरताना किंवा हलक्या हाताने दुधावरची साय बाजूला करताना  त्यांना बघितलं कि वाटायचं प्रत्येक हालचालीतून त्या स्वयंपाकघरातल्या वस्तु न् वस्तुशी मायेने बोलताहेत.
तशीच एक मातीत रमणारी मैत्रीण. बागेत काम करत असताना तिचा आनंदाने फुललेला चेहराच सांगतो कि त्याक्षणी बाईसाहेबांची आपल्या झाडा-फुलांबरोबर जंगी पार्टी सुरू आहे. किती मोहक असतो हा असा संवादही!
 
आमच्या घराशेजारच्या बागेत रोज संध्याकाळी रस्त्यावरच्या कुत्र्या-मांजरांसाठी खाऊ घेऊन एक आज्जी येतात. खाऊन झालं की मग शिस्तीत 'त्या मंडळाची' मीटिंग सुरू होते. मी एकदा हसून त्यांना म्हटलं, "आज्जी, खूप आवडतं नं तुम्हाला या मंडळींबरोबर गप्पा मारायला!" त्याही हसून म्हणाल्या, "हो गं, कारण 'ऐकून घेतात' ती माझं.." आज्जी खरतरं फार काही जीवाला चटका लावणारं बोलल्या होत्या. 
 
पण सांगायचा मुद्दा हा कि माणसं बोलायची थांबली तरी व्यक्त व्हायची थांबत नाहीत. फक्त अशा व्यक्त होण्याची भाषा ऐकणार्‍याला कळायला हवी, मग या संवादाचाही सोहळा होऊन जातो.
 
मित्र व मैत्रिणींनो कसंही, कुठेही, कोणाकडेही, पण व्यक्त होत राहणं महत्त्वाचं. मानसशास्त्र सांगतं कि आपल्या भावना आणि विचार व्यक्त न करण्याचे मन:स्वास्थ्यावर फार दूरगामी परिणाम होऊ शकतात, अगदी झोपेच्या विकारांपासून ते चिंता आणि नैराश्याच्या गंभीर आजारापर्यंत. मनाची कवाडं उघडली तरच मोकळा श्वास घेता येतो, तो घेऊया.. 
 
'बोलुया'!

- सोशल मीडिया