शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: बुधवार, 9 सप्टेंबर 2015 (14:16 IST)

तात्पर्य कथा : प्रमोशन

माधुरी घाईघाईने घरात शिरली. हातात पेढय़ांचा बॉक्स. सासूजवळ जात म्हणाली, 'आई, हा घ्या पेढा, तोंड गोड करा. मी आपल्याला एक आनंदाची बातमी सांगते. मला प्रमोशन मिळालंय.'
 
'काय? प्रमोशन? म्हणजे तू क्लार्क होतीस, ती आता हेड क्लार्क झालीस की, काय?'
 
'होय आई!' 
 
'छे, छे, सूनबाई, आपल्याला हे प्रमोशन नको. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ माझा पगार आणि माझ्या स्वर्गवासी मुलाचं पेन्शन यावर चालेल. 
 
तुझ्या नोकरीचीही आम्हाला गरज नाही. तू याच क्षणी परत जा आणि आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन ये.'
 
'पण का आई? गेली किती तरी वर्षे मेहनत करून वेतनाच्या तृतीय श्रेणीत कसेबसे दिवस काढले आपण. आज थोड्याशा आर्थिक सुबत्तेने समाजात अधिक चांगल्या तर्‍हेने, अधिक सन्मानाने जगण्याची संधी मिळते आहे आणि आपण म्हणताय नोकरी सोडून दे, पण का?'
 
'सूनबाई, तुझं प्रमोशन माझ्या गळ्याखाली उतरत नाही.'
 
'हे प्रमोशन माझं नसून, तुमच्या मुलाचंच आहे, असं आपण समजा. त्यांच्या मृत्यूनंतरच तर त्यांच्या जागी मला नोकरी मिळाली. मला काहीच त्रास नाही. त्याच शाळेत रिक्त पदावर हे प्रमोशन मला मिळालंय. हे शहर, ही जागा बदलण्याचाही प्रश्न नाही.'
 
''सूनबाई, तुला वाटेल ते तू समज, पण सासूच्या नात्याने मी या गोष्टीचा कधीच स्वीकार करू शकत नाही. मी एक तृतीय श्रेणीची क्लार्क आणि तू... माझी सून हेड क्लार्क? छे, छे, मी नाही हे सहन करू शकत..'
 
सुनेला वटलं, अनेक वर्षांच्या परिश्रमाने प्राप्त करून घेतलेलं हे शैक्षणिक प्रमाणपत्र अहंच्या एका तुच्छ झुळकीबरोबर उडून वार्‍याच्या वेगानं कुठं तरी दूर दूर चाललंय.