रविवार, 22 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कथा
Written By वेबदुनिया|

भिकारी

-अमोल कपोले

भिकारी
पहाटेची 3 ची वेळ ही काही सहज म्हणून फिरायला जाण्याची वेळ नाही. पण शहर नवीन असेल, तुम्ही एकटे असाल, आणि एरिया हाय प्रोफाईल असेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोप येत नसेल, तर फिरायला जाण्यासाठी कोणतीही वेळ अयोग्य नाही. उलट अशा अनवट वेळाच बऱ्याचदा आपल्याला त्या शहराबद्दल दोन वेगळ्या गोष्टी सांगून जातात.

..आणि त्या दिवशी त्या दोन वेगळ्या नव्हे, दिग्मूढ करणाऱ्या गोष्टी समजणे माझ्या नशिबात होते. उतरलेल्या हॉटेलमधून बाहेर येऊन मी सरळ मुख्य रस्ता धरला. शहराच्या त्या भागात बहुतांश हॉटेलं आणि पब्ज, क्लब्जची रेलचेल असल्याने रात्रीचे दहा वाजल्यासारखा माहौल होता. चकाचक विदेशी बनावटीच्या गाडयांनी पार्किंग लॉट ओसंडून वाहत होते. त्या रंगीबेरंगी विश्वाचा नजारा न्याहाळत मी फुटपाथवरून रमत-गमत चाललो होतो, चालता-चालता मी पुढच्या मोठ्या चौकात आलो. आता चौक पास करून सरळ पुढे जावं, की डावा अथवा उजवा रस्ता पकडावा, की सरळ मागे फिस्न रूमवर जावं या विचारात असतानाच मला कुतूहल जागं करणारं ते दृश्य दिसलं .

NDND
चौकात रेंगाळलेल्या एका कारच्या खिडकीशी झुकून एक मनुष्य, भिकारीच असावा असं त्याच्या कपड्यांवर वाटत होतं, कारमधल्या मालकाच्या विनवण्या करत होता. अखेर मालकाने त्याच्या अंगावर शंभराची नोट भिरकावली आणि ती कार वेगाने रस्त्यावरच्या तुरळक वाहतुकीत अंतर्धान पावली.

एक सर्वसाधारण दृश्य. त्याची नोंद कळत-नकळत नोंद घेऊन मी पुढचा रस्ता धरणार होतो. पण, त्या भिकाऱ्याच्या नंतरच्या कृतीने माझी उत्सुकता चाळवली गेली. शंभराची नोट खिशात टाकून तो भिकारी चौकातून डावीकडे वळला, मात्र असं करताना त्याच्या देहबोलीत विलक्षण फरक पडला होता. मघाशी शरीराच्या प्रत्येक अवयवातून व्यक्त होणारी लाचारी अचानक लुप्त होऊन, त्यात एक प्रकारचा अपराईटनेस आला होता. त्या चालण्यात एक प्रकारचा सावधपणा आणि लगबग होती, त्याच्या लक्षात येणार नाही इतकं अंतर ठेवून मीही त्याच्यामागे चालू लागलो. रस्त्यावरच्या एका अंधाऱ्या भागातून आता आम्ही जात होतो, भिकाऱ्याचं चालणं आता थोडं मंद झालं होतं, अखेर एका फारशी वर्दळ नसलेल्या अंधाऱ्या कोपऱ्यात तो थांबला.

खांद्यावरची मळकट पिशवी त्याने खाली घेतली. घाईत त्यातून काहीतरी बाहेर काढलं.. कपडेच होते ते. झटपट त्याने अंगावरचे फाटके, मळकट कपडे उतरवले आणि पिशवीत कोंबले. पिशवीतले काढलेले कपडे अंगावर चढवले, स्वच्छ पांढराशुभ्र शर्ट आणि गडद निळी पॅंट. खिशातून कंगवा काढून त्याने अंदाजानेच स्वत:चे केस विंचरले. पिशवीतून नॅपकीन काढला आणि खसाखसा स्वत:चा चेहरा नॅपकीनने पुसला. कायापालट. अक्षरश: कायापालट झाला होता त्याचा. पंधरा मिनिटांपूर्वी हाच माणूस पलिकडच्या चौकात चक्क भीक मागत होता, असं जर मी आता कुणाला सांगितलं असतं, तर त्याने मलाच अकलेचा भिकारी आहेस का, असं विचारलं असतं.

पिशवी उचलून समोरचा 'भिकारी' आता चालू लागला, मीही त्याच्या मागोमाग चालू लागलो. रस्ता जिथे संपत होता, त्या टोकाशी एक रिक्षा उभी होती. भिकाऱ्याने रिक्षावाल्याला हात केला, पाच मिनिटांतच भिकारी रिक्षात बसून स्टेशनच्या दिशेने गेला देखील..

..हा प्रकार काय आहे, याचा तपास लावल्याशिवाय परतायचं नाही, असं ठरवून मी मागून येणाऱ्या रिक्षाला हात दिला आणि स्टेशनला घ्यायला सांगितलं. रस्ता मोकळा असल्याने ती रिक्षा नजरेच्या टप्प्यातच होती.

हा प्रकार काय आहे, हे जाणून घ्यायची माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती..

स्टेशनसमोरच्या पानाच्या टपरीजवळच तो मला दिसला. पांढरपेशा नोकरदार माणसासारखा तो सिगरेट ओढत उभा होता. आता आपण काय करावं, ते कळेना म्हणून मीही थेट टपरीजवळच गेलो आणि सिगरेट शिलगावली.

काय साहेब, कुणाला शोधताय?
त्याचा प्रश्न मला अगदीच अनपेक्षित नव्हता, पण मी त्याच्या मागावर आहे, हे त्याने फार पटकन ओळखल्याचं मला आश्चर्य वाटलं.
नवीन पोस्टिंग दिसतेय तुमची.
म्हणजे तो मला पोलिस समजला होता.
मी पोलिस नाही, मी एका वाक्यात त्याची उत्सुकता संपवली.
समोरच्या माणसाला मी पत्रकार आहे, असं सांगितल्यावर दोन गोष्टी शक्य असतात,
एक तर तो काहीच बोलत नाही, किंवा खूपच बडबड करायला लागतो.
सुदैवाने तो दुसऱ्या प्रकारातला निघाला. आणि त्याने त्याची अद्‌भूत किंवा नॉट सो अद्‌भूत अशी कहाणी मला ऐकवली.

पुढच्याच स्टेशनवर उतरून तो आपल्या घरी जाणार होता. घर म्हणजे तुमच्या-आमच्यासारखं वन बीएचके फ्लॅट. त्याचं या व्यवसायातून येणारं उत्पन्न दरमहा साधारण तीसएक हजार रूपये होतं, होय, तीनएक नाही तीसएक. भीक मागणे हा त्याचा व्यवसाय होता. त्यासाठी तो त्या उच्चभ्रू वस्तीत रोज रात्री आठ ते पहाटे तीन अशी ड्यूटी करत असे. रोज घरून निघताना तो टापटीप, स्वच्छ कपडे घालून निघत असे. आज त्याने जिथे कपडे बदलले, तशाच कमी वर्दळीच्या जागी थांबून तो भिकाऱ्याचा वेश परिधान करे. पहाटे तीनला ऑफिस संपल्यावर तो पुन्हा कपडे बदलून घरी जाई. गेली 20 वर्षे तो हे करत होता.

NDND
याच वीस वर्षांच्या कमाईतून त्याने मुलांची शिक्षणं केली, त्याचा एक मुलगा झाडू विकण्याचा व्यवसाय करतो, तर दुसरा कॉलेजला आहे. सध्या राहत असलेल्या वन बीएचके फ्लॅटव्यतिरिक्त त्याने दुसराही एक मोठा फ्लॅट बुक केला आहे, लवकरच त्याचा ताबा मिळेल. याशिवाय इतरही व्यवसायांत त्याने पैसा गुंतवलेला आहे.

एकूण तो आपले दैन्यावस्थेतील, दरिद्री जिण्याचा पुरेपूर उपभोग घेतो आहे.
दिवसाला हजार रूपयांची बेगमी देणारा असा व्यवसाय दुसरा नाही, असं त्याचं मत आहे.
त्याच्या व्यवसाय एरियात गेली वीस वर्षे त्याची एकट्याची मक्तेदारी आहे, दुसऱ्या कुणालाही तो इथं पाय रोवू देत नाही. त्यासाठी भाईंपासून सायबापर्यंत सर्वांची फिल्डिंग त्याने व्यवस्थित लावली आहे.
..हातातल्या सिगरेटचा चटका बसला, तेव्हा मी भानावर आलो. तो नुकताच निघून गेला होता .
धक्क्यातून बाहेर येत मी रिक्षाला हात केला,
बाबा कुछ खाने को दो..
एक भिकारी रिक्षावाल्यापुढे हात पसरत होता.
..मला मात्र त्याच्या जागी सुटा-बुटातला कडक् उद्योगपती दिसू लागला होता.