गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By वेबदुनिया|

वास्तुनुसार फुटकी भांडी, ‍फुटकं नशीब

आपल्या घरातली भांडी आपल्या जीवनशैलीची ओळख घडत असतात. त्यामुळेच आजकाल डिझायनर भांडी वापरण्याची क्रेझ आली आहे, पण नवी डिझायनर भांडी वापरताना जुनी, तुटकी फुटकी भांडी सांभाळून वेगळी ठेवली जातात. अशी तुटकी भांडीवेगळी ठेवणं हे अशुभ आहे. घरात अशी फुटकी भांडी ठेवल्यामुळे दारिद्रय येण्याची शक्यता असते. याचबरोबर इतरही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

घरात कधही तुटकी-फुटकी भांडी वापरू नयेत किंवा फुटक्या भांड्यात जेवू नये. धर्मशास्त्रात असं सांगितलं आहे की अशा फुटक्या भांड्यात जेवल्यास ईश्वराची कृपा राहत नाही. जी व्यक्ती फुटक्या भांड्यात जेवते, तिच्यावर लक्ष्मी रुसते आणि त्या घरातून निघून जाते. यामुळे घरावर आर्थिक संकटं कोसळतात.

वास्तुशास्त्रानुसारही फुटकी भांडी घरात असणं अशुभच मानलं जातं. ज्या घरात फुटकी भांडी असतात, त्या घरात वास्तुदोष असतो. यातून उत्पन्न झालेला दोष इतर उपाय करूनही नष्ट होत नाही. फुटक्या भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणूनच, घरात अशा प्रकारची भांडी ठेवू नयेत. अशी भांडी फेकून दिल्यास वास्तुदोष मिटतो आणि घरात शुभ घटना घडू लागतात.

खराब भांड्यात जेवण जेवल्यास आपले विचारही नकारात्मक बनतात. जशा ताटात आपण जेवतो, तसा आपला स्वभाव बनतो. म्हणूनच जेवण नेहमी स्वच्छ आणि चांगल्या ताटात करावे. यामुळे आपले विचारही शुद्ध होतात आणि त्याचा आपल्यावर चांगला परिणाम होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.