मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By

निबंध – माझी आई

“राहुल गृहपाठ झाला कां? चल आटप लवकर. शाळेला उशीर होतोय!”
“हो आई! झाला गृहपाठ. ‘माझी आई’ या विषयावर बाईंनी नीबंध लिहून आणायला सांगीतला होता. माझी आई मला लवकर उठवते. गृहपाठ करुन घेते. अभ्यास शिकवते. मला गोष्ट सांगते. बर नसल तर दवाखान्यांत नेते.”
“पुरे पुरे! चल बॅग भर लवकर. नाश्ता ठेवलाय. डबा भरुन घे.”
राहुलची धावपळ उडाली. आईने भराभर मदत करुन शाळेत पाठवले. पण संध्याकाळी राहुल आला तो हीरमुसला होऊन.
“सगळ्या मुलांनी निबंध लिहिले होते. बाईंनी मात्र वेगळेच सांगीतले. त्या म्हणाल्या ‘मुलांनो! आई तुमच्यासाठी खुप कांही करते. म्हणुन ती तुम्हाला आवडते. पण या आईबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तिच्या आवडीनिवडी, तिचे छंद, तिचे शिक्षण, तिचा वाढदिवस, तिच्या श्रमांबद्दल तुम्हाला, तुमच्या वडिलांना, भावंडांना काय वाटते? तुम्ही सर्वजण तिच्यासाठी काय करता? या सगळ्याचे निरीक्षण करा. लिहिताना हवे तर तुमच्या ताईची किंवा दादाची मदत घ्या. वडिलांनाही विचारा. आईला मात्र विचारायचे नाही. तुम्ही आठवीतली मुले. थोडे विचारपुर्वक लिहा.’

मुले विचारात पडली. म्हटले तर सोपा, म्हटले तर कठीण असा हा निबंध होता. राहुलच्या निरीक्षणाला सुरवात झाली. आईच्या आवडीनिवडी? आपण फक्त बटाट्याची भाजी खातो. आई तर सगळ्याच भाज्या व चटण्या खाते. सर्वांना ताजे वाढते आणि कधी कमी पडले तर थोडेसेच खाऊन उठते. जास्त उरलेले फुकट जाऊ नये म्हणुन नको असतानाही खाते. शिळे स्वतःच्या पानांत घेते. अरे,आपण कधीच आईला म्हणत नाही, आई आज मला शिळे वाढ. तु ताजी पोळी खा. आपणच कशाला! बाबा, ताई, दादा एवढे मोठे. पण ते देखील म्हणत नाहीत. मला टेबल टेनीस खेळायची आवड आहे. म्हणुन आईने माझ्या वाढदिवसाची वाट न बघता मला त्याचे साहित्य आणले. आईला कसली बरे आवड आहे? बरोबर! वाचनाची आणि हार्मोनीयम वाजवण्याची. पण गेली काही वर्षे हार्मोनीयम बीघडला आहे. आईने त्याच्या दुरुस्तीबद्दल सगळ्यांना सुचवुन पाहिले. सर्वांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे वर्ष झाले हार्मोनीयम बंदच आहे. थोडा जरी वेळ मिळाला तरी आई काही वाचत असते. पण एखादे पुस्तक खरेदी करायचे असेल तर बाबा म्हणतात ‘पुस्तकांच्या किंमती फार वाढल्या आहेत. त्या पैशांत ताईच्या अभ्यासाचे एखादे पुस्तक येईल.’ मग आई हे पटवुन घेते.

रंग? आईला कुठला बरे रंग आवडतो? काही कळत नाही. कारण आई स्वतःला फारच क्वचित साडी घेते. लग्नकार्यात मिळालेल्या साड्या ती वापरते. त्या ज्या रंगाच्या असतील त्या ती चालवुन घेते. पण बेडशीटसची खरेदी करताना मात्र आईने आकाशी रंग निवडला होता.

आईचा वाढदिवस—कधी बरे असतो? आईलाच विचारायला हवे. पण बाई म्हणाल्या ‘आईला काही विचारायचे नाही.’ ताईलाच विचारावे‘ए ताई, आईचा वाढदिवस केव्हा असतो गं?’ ‘अरे 12 सप्टेंबर’

काय करतो बर आपण या वाढदिवसाला? छे,तो साजरा केल्याचे आठवतच नाही. ताईचा,माझा व बाबांचा वाढदिवस मात्र आई आमच्या आवडिचे पदार्थ करुन करते. ताईसाठी दुधी हलवा, माझ्या वाढदिवसाला गुलाबजाम, बाबांच्या वाढदिवसाला पुरणपोळी. आईला कोणता गोड पदार्थ आवडतो? काही माहीत नाही. ‘ बाबा, आईला कोणता गोड पदार्थ आवडतो? अहो बाबा जरा इकडे लक्ष द्या ना!’

‘अरे असे काय हवय तुला? कटकट करु नकोस. मी वाचतोय दिसत नाही? आईला काय आवडत ते तिला विचार. मला काय माहीत? ‘

ताईला विचारल तर तिला पण माहीत नव्हत.

गेल्या आठवड्यात ताई तिच्या मैत्रीणींबरोबर सहलिला जाणार होती. आई लवकर उठली. तिने दुधी हलवा बनवला. तिखटमिठाच्या पुर्‍या करुन दिल्या. बाबांनी बरोबर दिलेल्या पैशांखेरीज तिच्या जवळची पन्नासची नोट दिली. माझ्या सहलिच्या वेळी आणि बाबांच्या सहलिच्या वेळेसही आई असेच कांही ना कांहीतरी करते. ती कधी गेली होती बरे सहलिला? बरोबर, गेल्या महिन्यात तिच्या महिला मंडळाची सहल होती. पण बाबांनी त्यंच्या मित्रांना जेवायला बोलावले होते. म्हणुन आईला सहलिला जाणे रद्द करावे लागले.

आईचे शिक्षण? कॉलेजच्या दुसर्‍या वर्षापर्यंत. असे आठवते. कारण एकदा आई म्हणाली होती, ‘मला शिकुन डॉक्टर व्यायच होत.’ पण दोन मामांच्या शिक्षणाकरता आईला शिक्षण सोडाव लागल. आणि तिचे लग्न करुन दिले. लग्नानंतर मुलांचे जन्म आणि संसार. आईला पुढे शिकता आले नाही. आई तिच्या मैत्रिणीला अस काहीतरी सांगत होती, अस अंधुकस आठवतय.

वर्तमानपत्र वाचायला आईला फार आवडात. दुपारी सगळी कामे झाली की आई पेपर वाचते. पण ताई कॉलेजला जायला लागल्यापासुन आणि मी पांचवीत गेल्यावर आमच इंग्लिश सुधारायला हव म्हणुन बाबांनी मराठी पेपर बंद करुन टाकला आणि इंग्लिश पेपर सुरु केला. तेव्हापासुन आईच पेपर वाचनच थोड कमी झाल आहे. पेपर चाळुन ती ठेऊन देते. फावल्या वेळात टी.व्ही. बघावासा वाटतो तिला. पण बाबा घरात आले की इंग्लिश न्युज किंवा इंग्लिश चर्चेचे कार्यक्र लावतात. ताई तिच्या आवडिचे केबलचे पिक्चर्स लावते आणि मला कार्टुन्स हवी असतात. या सगळ्या भानगडीत आईला फारच कमी वेळ टीव्ही बघायला मिळतो.

आईच्या मैत्रिणी? तशी एखादीच तिची खास मैत्रीण आहे. म्हणजे सगळ्यांच करता करता मैत्रिणींकरीता तिला वेळच मिळत नाही. ताई मैत्रिणींबरोबर सिनेमाला किंवा पिकनीकला जाते. मी तर दररोजच मित्रांबरोबर संध्याकाळी खेळायला जातो. बाबांचे मित्र शनिवार- रविवार पत्यांचे डाव टाकतात. आई सर्वांसाठी चहापाणी करते. पण आईची ती मैत्रीण आली की सर्वजण तिची टिंगल करतात. ती उषा बोलते कशी, ती भटकभवानी आहे, कुणाकडे कधी जावे अशा मॅनर्स तिला नाहीत अशी टिका बाबा आणि ताई करतात. त्यामुळे आईपण तिच्याशी मोकळेपणाने बोलत नाही.

आईला संध्याकाळी फिरायला जायला आवडत. पण शेजारच्या काकुंना नाही आवडत अस आई एकदा म्हणाली होती. बाबांना एकतर ऑफीसमधुन यायला उशीर तरी होतो किंवा लवकर आले तर कंटाळा येतो. ताई तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात. मग आई एकटीच भाजी घेऊन फिरुन येते. पण तिला घरी परतायची घाई असते. कारण तिला उशीर झाला तर आम्ही भुक-भुक करुन तिला हैराण करणार. कधी कधी ती उगीचच का चिडते,वैतागते ते आता मला थोडे थोडे समजतय.

एके दिवशी मी खेळायला गेलो होतो. तिन्हीसांजा झाल्या होत्या. मला तहान लागली म्हणुन मी घरी आलो, तर आई दूरवर खिडकितुन बघत रडत होती. मी आईला विचारले, ‘आई काय झाले?’ ‘कांही नाही,कुठ काय?’ चटकन डोळे पुसत आई म्हणाली.

‘आई सांग ना, काय झाले?’ मी परत म्हणालो. तर ती म्हणाली, ‘अरे काय सांगु?लहान आहेस तु! आणि मोठा झालास तरी काय फरक पडणार आहे म्हणा!’ आई पुटपुटत म्हणाली. मला पण काही कळल नाही. मी तिच्याकडे दुर्लक्ष करुन खेळायला धूम ठोकली.

बाईंनी पंधरा दिवसांची मुदत निबंध लेखनासाठी दिली होती. राहुलच निरीक्षण चालु होत. आईच वागण व घरातील इतरांचं वागण याची थोडीफार तुलना करत असताना आई थोडिशी का होईना त्याला उमगली होती.
आईवरचा निबंध पुरा होत आला होता. आणि निबंधाचा शेवट करता करता त्याच्या वहीवर त्याच्याच डोळ्यातील दोन अश्रु ओघळले.
साभार :  संग्रह  असंच काहीतरी....