शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By
Last Updated : मंगळवार, 14 एप्रिल 2020 (07:53 IST)

डॉ. आंबेडकरांची विनोदवृत्ती

कुणीतरी म्हटलं की, हास्य असा अलंकार आहे की, तो कोणत्याही मुखकमलावर सुंदर दिसतोच. बाबासाहेब आंबेडकर आणि विनोद हे शक्य तरी आहे का? असा प्रश्न काहींच्या मनात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला कारण बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्तवाची जनमानसात जी प्रतिमा आहे ती गंभीरपणाची, पण बाबासाहेबांच्या जीवनाचे बारकाईने अवलोकन केल्यास गंभीरपणा आणि गमतीदारपणा यांचा सुंदर संगम बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महासागरात कसा झाला होता, याचा मनोहरी प्रत्यय आपल्याला येतो. शब्दांना अनेक अर्थछटा असतात याची जाणीव बाबासाहेबांसारख्या प्रतिभावंतास होती म्हणून त्यांनी शब्दांचा शस्त्रासारखा वापर केला आहे. हास्य हे प्रभावी अस्त्रासारखे आहे असा महत्त्वपूर्ण विचार बाबासाहेबांनी मांडला आणि वेळप्रसंगी त्याचा प्रत्यय त्यांच्याजवळच्या सहकार्‍यांना आलेला आहे. विनोद सांगण्याची त्यांची खास अशी शैली होती. समोरच्याला विनोद सांगत असताना ते स्वतः अभिनय करून सांगत असल्याने विनोद अधिकच प्रभावी वाटत असे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मि‍ष्किल स्वभावाची अनेक उदाहरणे देता येण्यासारखी आहेत. एकदा बाबासाहेब शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गेले असता थोडावेळ गाणी ऐकल्यानंतर गमतीने ते म्हणाले, ‘शास्त्रीय संगीत म्हणजे काय असते ते आत्ता समजलं, पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळलं की, झालं शास्त्रीय संगीत.' उपस्थित सर्व जण हसू लागले. बाबासाहेबांचे विनोद अतिशय मार्मिक  होते. 10 जुलै 1947 रोजी बाबासाहेब दिल्लीला जायला निघाले असताना ते विमानात बसतेवेळी हिंदू महासभेच्या पुढार्‍यांनी त्यांना भगवा ध्वज अर्पण केला व आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग भगवा असावा यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, एका महाराच्या मुलाकडून घटना समितीवर भगवा ध्वज लावणची अपेक्षा तुम्ही करता आहात नाही का?' बाबासाहेबांच्या  विनोदातले मर्म अतिशय सखोल आणि विचार करायला भाग पाडणारे होते.
बाबासाहेब प्रतिस्पर्धंना आपल्या वक्तृत्वाने चारीमुंड्या चीत करीत असत. एकदा काँग्रेस संबंधी बोलताना बाबासाहेब म्हणाले, ‘काँग्रेसच्या बाया महारवाड्यात जाऊन आमच्या बायांच्या डोक्यातील उवा काढतात, त्यांची लुगडी धुतात, पोरांना आंघोळी घालतात. नुकतेच काँग्रेसच्या बायांनी पुण्याच्या मांग वाड्यात जाऊन आमच्याम मुलांना दूध पाजले पण दुसर्‍या दिवशी त्या मुलांना हगवण लागली अशी बामती उठली.' अर्थात या ठिकाणी अतिशोक्तीतून सहजपणे विनोद निर्मिती   साधली आहे. पण त्यांनी केवळ विनोदासाठी अतिशोक्तीचा वापर केला नसून त्यांनी विशिष्ट प्रवृत्तीचे दर्शन घडवावाचे होते.
आंबेडकरी विनोद जातीवादी वृत्तीवर, ढोंगीपणावर, दांभिकतेवर कडाडून हल्ला करताना दिसतो. महात्मा गांधींनी गोमलेज परिषदेत अस्पृशविषयी काय भूमिका  घेतली होती हे सर्वश्रुत आहे. मुंबई येथे 6 मे 1939 रोजी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनात गांधीजींच्या   धोरणांवर बोलताना बाबासाहेब म्हणाले, ‘1928 साली काँग्रेस सात कोटी
अस्पृश्याना शून्य समजत होते. दोन वर्षानंतर राऊंड टेबल परिषद भरली. तेथे अस्पृश्य लोकांनी शून्याचे दहा केले. एकावर पूज्य वाढवले पण गांधीजी दहाचे
पुन्हा शून्य करण्याचा घाट घालत आहेत, पण त्यांना ते साधले नाही.' मुंबईच्या  एका सभेत उपरोधिक शैलीत बोलताना ते म्हणाले, ‘हिंदूंनी आमच्यासाठी काय केले? त्यांनी एक सुधारणा केली. ती म्हणजे रेल्वेमध्ये जाताना ते आमच्या  डब्यामध्ये असतात तेही माहीत नसतं म्हणून.'
हसता हसता अंतर्मुख करायला लावणे हे आंबेडकरी विनोदाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. समाजाचे दोष दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी विनोद या शस्त्राचा अत्यंत कौशल्याने वापर केला. आंबेडकरी विनोद हा शस्त्रासारखा आहे पण तो गुंडाच्या शस्त्रासारखा जीव घेणारा नसून डॉक्टरच्या शस्त्रासारखा जीवदान  देणारा, समाजाच्या नकोशा गोष्टीची शस्त्रक्रिया करणारा आहे. म्हणजे आंबेडकरी
विनोद प्रेममूलक आहे. त्यांचा विनोद स्वतःकडे तटस्थपणे पाहायला शिकवतो तसाच तो समाजाची कठोर चिकित्सा करण्याची दीक्षाही देतो. अंतर्मुख करण्याचे महान सामर्थ्य या विनोदात आहे. एकदा बाबासाहेबांना एक लाख अठरा हजारांची थैली देण्याचे ठरवले. त्या वेळी बोलताना समारंभात ते म्हणाले, ‘  आपण एक लाख अठरा हजार रुपयाची थैली दिली पण ती अगदीच हलकी आहे मला थोडा संशय आला.' जनतेचा पैसा ते जनहितासाठी वापरत असत. मोठ्या कामासाठी पैसा कमी पडत असे, ही खंत ते विनोदी ढंगाने व्यक्त करीत.
आमदार-खासदार हे अभ्यासू असावेत असे डॉक्टर आंबेडकरांचे मत होते. त्यांनी   समाजासाठी त्यागाची तयारी ठेवावी असे त्यांना वाटत होते. 2 एप्रिल 1939 रोजी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी त्यांनी भाषण केले. ते म्हणाले, ‘आपण आजच्या मुंबई असेंब्लीमधील काँग्रेस सभासदांकडे चिकित्सक दृष्टीने पाहिले की, हा किंग एडवर्ड हॉस्पिटलमधील लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे, म्हातारे वगैरे रोग्यांचा राखीव वॉर्ड हे की का? असा भास होतो.' बाबासाहेबांच्या   आयुष्यातील अशा अनेक गमतीदार आठवणी माईसाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या आहेत. बाबासाहेबांचा प्रत्येक विनोद प्रसंगनिष्ठ होता. ते स्वतः विनोदी तर होतेच, त्यांना विनोदी स्वभावाची माणसे आवडत असत. ते
विनोदाचा मनसोक्त आस्वाद घेत असत. ते सामान्य माणसात रमत, मनमोकळेपणाने विनोद करत. विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवूनही त्यांचा   विनोद फुलताना दिसतो. त्यांच्या भाषणातून वेळोवेळी मार्मिक विनोदांनी समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले होते. त्यांचा हा अज्ञात पैलू ज्ञात व्हावा हीच इच्छा आहे.
डॉ. धम्पाल माशाळकर