पंतप्रधान मोदी उदया सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करून महत्वाच्या घोषणा करतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ तारखेला संपत आहे. त्याच दिवशी सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते पुढील निर्णय काय घेतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (११ एप्रिल रोजी) देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली होती. त्यानंतर राज्यातील लॉकडानचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यासंदर्भात काही घोषणा करतात का याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांचा आकडा 9152वर पोहचला आहे. मृतांचा आकडा 308 च्या घरात आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वात अधिक असून तो 1982 इतका झाला आहे. करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढवून 30 एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे.