रोहन नामजोशी
काही प्रश्नांची ठाम उत्तरं नसतात. त्याची अनेक उत्तरं असतात. व्यक्तीपरत्त्वे ती बदलत असतात. तरीही प्रश्न संपत नाही आणि त्यांची उत्तरंही. उद्या 8 मे रोजी 'मदर्स डे' साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने अशाच एका कळीच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. आई होण्याचं योग्य वय कोणतं?
पूजा खाडे पाठक पुण्यात राहतात. त्या HR क्षेत्रात काम करतात. त्यांनी 23 व्या वर्षीच आई होण्याचा निर्णय घेतला. आज त्या 33 वर्षांच्या आहेत आणि त्यांची मुलगी 10 वर्षांची आहे. हा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचं त्या सांगतात. त्यांच्या मते, "प्रत्येक क्षेत्रात एक स्पर्धा असते, पदांची उतरंड असते. माझं करिअर फार जोमात चालू झालेलं नव्हतं आणि तेव्हा मला असं वाटलं की तेव्हाच मी करिअरमध्ये ब्रेक घेतला तर पुढे जाऊन जास्त संधी मिळतील. त्यामुळे कामाची नशा येऊन मध्येच ती सोडण्यापेक्षा आधी आई झालेलं बरं असा मी विचार केला."
"दुसरा विचार मी केला तो आरोग्याचा. 23व्या वर्षांत माझं आरोग्य उत्तम स्थितीत होतं. त्यामुळे येणारा ताण, संयम या सगळ्या गोष्टी मी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळू शकेन असं वाटलं. अजून एक असं वाटलं की मला माझ्या मुलांमध्ये आणि माझ्यात जनरेशन गॅप नको होती. म्हणूनही मी हा निर्णय घेतला.
आई होण्याचं वय असतं का?
तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर हा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे. पण वैद्यकीयदृष्ट्या बघायला गेलं तर वेगळ्या लढाया असतात. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नंदिनी पाळशेतकर यांच्या मते 25- 35 हे आई होण्याचं सर्वांत योग्य वय आहे.
त्या म्हणतात, "35 नंतर आई होण्यात अनेक अडचणी असतात. त्यामुळे 25 ते 35 ही दहा वर्षं योग्य असतात. 35 वर्षांनंतर गरोदर राहण्याचा प्रयत्न केला तर खूप त्रास होतो. हल्ली लग्न उशीरा होतात. त्यानंतर कधीतरी आई होण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मुलींनी अतिशय सावध राहण्याची गरज आहे. त्यांनी प्रजनन चाचणी केली पाहिजे. AMH(Anti Mullerian hormone) नावाची एक चाचणी असते. त्यात अंड्यांची संख्या कळते. ती जर कमी झाली तर धोका असतो. त्यामुळे मुलींनी सावध रहायला हवं."
डॉ. चैतन्य शेंबेकर नागपुरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या मतेही आई होण्याचं योग्य वय 25 ते 30 आहे. ते म्हणतात, "आमच्याकडे जे IVF साठी पेशंट येतात त्यांचे Ovarian reserve 30 वर्षांच्या वयात कमी झाले असतात. 32 वर्षांपर्यंत तर ते अगदीच कमी झालेले असतात. आपण आता पाश्चिमात्य देशांचं अनुकरण करतो. त्यानुसार करिअरवर भर दिला जातो. त्यामुळे मुख्य अडचण येते. कितीही मुलं हवे असले तरी याच काळात जन्मात घालायला हवीत असं माझं स्पष्ट मत आहे."
डॉ. पाळशेतकर पुढे सांगतात, "हल्ली Ovarian ageing ची मोठी समस्या आहे. माझ्या क्लिनिकमध्ये ज्या मुली येतात त्यांच्यापैकी 30 टक्के मुलींना ही समस्या आहे. त्यात लग्न उशीरा होतात. नंतर कधीतरी मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला जातो. हल्ली अंडी गोठवण्याचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. तोही पर्याय अनेक मुली स्वीकारत आहे. पण त्या अपवाद आहे. तरी मला असं वाटतं की 25 ते 35 हे आई होण्याचं योग्य वय आहे."
अंडी गोठवण्याचा पर्याय फारसा व्यवहार्य नसल्याचं मत डॉ. शेंबेकर व्यक्त करतात. अंडी गोठवण्याची हल्ली एक लाट आली आहे. अनेक मोठ्या कंपन्या त्यासाठी इन्शुरन्सही देतात. मात्र फक्त अंडाशयाचं नाही तर बाईचं वयही या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं. जसं वय वाढतं त्याप्रमाणे शरीरावर मर्यादा होतात. तरुण वयात सहनशक्ती जास्त असते. शारीरिक क्षमता जास्त असते.
बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म आहे असं म्हणतात. कारण गरोदरपणात अनेकदा डायबेटिज, ब्लड प्रेशर सारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे लवकर लग्न करून लवकर मूल जन्माला घातलं की या समस्या टळतील असं डॉ. शेंबेकर सांगतात.
उशीरा मूल होताना...
रिटा जोशी मुळच्या मुंबईच्या आहेत. त्या आयटी क्षेत्रात काम करतात. सामाजिकदृष्ट्या जे लग्नाचं वय आहे त्या वयात त्यांच्या करिअरमध्ये बिझी होत्या.
अनेकदा त्यांना परदेशात कामानिमित्त जावं लागलं. अशा अनेक कारणांमुळे त्यांचं 35 व्या वर्षी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यांनी नैसर्गिकरित्या मूल होण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी झाले नाहीत.
पुढे त्यांनी IUI, IVF चा मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला खरा, पण तेही करायला त्यांना करिअरमुळे वेळ मिळाला नाही. शेवटी ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी IVF चा मार्ग स्वीकारला. त्यात लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे या उपचारांसाठी लागणारा वेळ देता आला आणि शेवटी त्या एक गोंडस मुलीची आई झाल्या.
करिअरमुळे उशीरा लग्न आणि त्यामुळे अर्थातच उशीरा मातृत्व ही कथा फक्त रिटा जोशींची नाही.
स्त्रियांचं वय महत्त्वाचं का आहे?
स्त्रियांचं वय महत्त्वाचं आहे कारण त्यांच्याकडे असलेल्या अंड्यांची संख्या. गेल्या अनेक दशकापासून वैज्ञानिकांचं निरीक्षण आहे की वाढत्या वयानुसार स्त्रियांच्या गर्भाशयातील अंड्यांची संख्या कमी होते.
पुरुषांमध्ये दिवसाला रोज लाखो स्पर्म तयार होत असतात. स्त्रियांमध्ये अंडी असतात. जन्माच्या वेळी स्त्रियांमध्ये 10 लाख अंडी असतात. पाळी येईपर्यंत ही संख्या 3,00,000 होते. 37 वर्षांच्या वयापर्यंत ही संख्या 25 हजार होतो तर 51 वर्षापर्यंत ही संख्या 1000 होते. त्यातही फक्त 300 ते 400 अंड्यांमध्ये मुलं जन्माला घालायची क्षमता असते.
वाढत्या वयानुसार अंड्यांची संख्या कमी होतेच पण त्याचबरोबर गुणसुत्रांचा दर्जा आणि अंड्यांमध्ये असलेल्या DNA चा दर्जाही घसरतो.
मुलींची मासिक पाळी साधारण 13 व्या वर्षी सुरू होते. पहिल्या एक दोन वर्षांत अंडे बाहेर पडायला सुरुवात होत नाही. अशा पद्धतीने 33 वर्षं वयापर्यंत अंड्यांची संख्याच संपण्याची शक्यता जास्त आहे. बहुसंख्य महिलांची प्रजननक्षमता रजोनिवृतीच्या आठ वर्षं आधीपर्यंत संपते.
अँड्रिया ज्युरिसिकोव्हा गर्भतज्ज्ञ आहेत. त्यांनी एक संशोधन केलं आहे. त्यात असं लक्षात आलं की अंडाशयातली अंड्यांची संख्या जनुकीय स्थितीवर अवलंबून असते. मात्र त्यात स्त्रियांच्या आयुष्यात काय उलथापालथी होतात त्यावरही अंड्याची संख्या अवलंबून असतात. विषारी रसायनांशी संपर्क, ताण तणाव यावरही अंड्यांची संख्या अवलंबून असते.
संख्येबरोबरच अंड्यांचा दर्जा हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. वाढत्या वयाबरोबर हा दर्जाही कमी होत जातो.
गुणसूत्रांचं महत्त्व
गुणसूत्र म्हणजेच Chromosomes सुद्धा प्रजननात महत्त्वाचा वाटा उचलतात. संशोधकांच्या मते गुणसूत्रांमध्ये बिघाड झाला तरी प्रजननात अडथळे येतात. खरंतर गुणसुत्रांमध्ये काही विकृती असतात.
बहुतांश सगळ्याच स्त्रियांमध्ये त्या असतात. तरुण स्त्रियांमध्ये त्या कमी संख्येने असतात. मात्र वाढत्या वयानुसार हे बिघाड होण्याची शक्यता वाढत जाते.
गुणसुत्रात अडथळे आले म्हणजे स्त्रियांना मूल होऊ शकत नाही असा होत नाही. मात्र मासिक पाळीच्या वेळी ज्या अंड्याची निर्मिती होते त्यापासून निरोगी मूल जन्माला येण्याची शक्यता कमी असते.
सामाजिक भाग
मूल उशीरा होण्यासाठी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना डॉ सांगतात, "हल्ली 25 वर्षाच्या वयात कोणी लग्नाचा विचारही करत नाही. तिशीत लग्न करतात आणि मग विचार करतात की जेव्हा हवं तेव्हा आपल्याला मूल होईल. त्यांना असं वाटतं की 30 हे अगदीच कमी वय आहे. पण त्यांना हे अजिबात माहिती नसतं की तोपर्यंत हार्मोन्सचा साठा तोपर्यंत पूर्णपणे संपला असतो. मुली आपल्या करिअरवर फोकस करतात, मग लग्नाला उशीर करतात आणि मग पुढच्या समस्या निर्माण होतात."
पूजा खाडे-पाठक यांच्या नवऱ्याचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यामुळे आता त्या सिंगल पॅरेंट आहेत. लवकर आई झाल्यामुळे त्यांची मुलगी मोठी झाली आणि त्यांना मुलीची काळजी तुलनेने कमी आहे. दुसरीकडे रिटा यांनीही उशीरा आलेलं पालकत्व आनंदाने स्वीकारलं आहे. आई होण्याचा निर्णय मोठा असतो, आयुष्य बदलणारा असतो. तो योग्य वेळी घेतला तर आयुष्य सर्वार्थाने सुखद होऊ शकतं.