मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By

या आईला तर काही, काही कळत नाही

ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते
इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही
या आईला ना काही कळतच नाही
 
दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही
या आईला ना काही कळतच नाही
 
कपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते
बस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून.. भरभर येते
नमस्कार करायला लावते.. कौतुक करत नाही
या आईला ना काही कळतच नाही
 
शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू… नेहमीच ओरडते
अभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते
मी चित्रं काढलेलं… लक्ष देत नाही
या आईला ना काही कळतच नाही
 
होमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही
या आईला ना काही कळतच नाही
 
दमून जाऊन झोप येते..मग मला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला वेळ देता येत नाही
पापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला आवडत नाही
पण या आईला ना काही म्हणजे काही कळतच नाही…
 
साभार : संग्रह असचं काहीतरी …..