मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

मुंबई हल्ल्यांमागचे अनुत्तरित प्रश्न

- नितीन फलटणकर

NDND
मुंबईत झालेल्या हल्ल्याला आता आठवडा उलटत आला आहे. या हल्ल्यांचे घाव मुंबईच नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकांच्या मनावर इतके खोलवर झाले आहेत, की ते भरून यायलाही पुष्कळ काळ जावा लागणार आहे, यात शंका नाही. मुंबईतील हल्ल्यांचा तपास आता द्रुतगतीने सुरू असला तरी या एकूण घटनेचे असे काही पैलू आहेत, ज्यामागची कारणमीमांसा कळलेली नाही. दहशतवाद्यांचा खात्मा झाला असला तरी ते जाताना आपल्या पुढ्यात अनेक प्रश्न ठेवून गेलेत.

* मुंबई पोलिसांनी स्पष्ट केल्याप्रमाणे जर फक्त दहाच दहशतवादी मुंबईत दाखल झाले असतील, तर मुख्यमंत्री विलासराव देशमुख
आणि आबांनी हल्ला झाला त्या दिवशी दहशतवाद्यांची संख्या छातीठोकपणे आधी 40 नंतर 24 का सांगितली? पण दहशतवादी ज्या कुबेर नावेने भारतात अर्थात मुंबईत दाखल झाले त्या नावेत पोलिसांना थंडीपासून रक्षण करणारी एकूण 15 जाकिटे आणि गोधड्या मिळाल्या आहेत. जर दहशतवादी 10 तर मग जाकिटं 15 का? की पाच दहशतवादी आपल्या साथीदारांना मुंबईपर्यंत सोडून परत आल्या मार्गी परतले? की पोरबंदरवरून गुजरातमध्ये उतरले? की मुंबईतच उतरून पुढच्या आदेशांची वाट पाहत आहेत का?

* ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी पोलिसांनी स्पष्ट केले होते, की दहशतवादी दोन नावांनी भारतात दाखल झाले तर 10 जणांसाठी दहशतवाद्यांनी दोन नावा का केल्या असतील?

* याच दिवशी पोलिसांनी आणखी एक स्टेटमेंट दिले होते, दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा समुद्रात ओतला, ही माहिती पोलिसांना कोणी दिली? पोलिसांना स्थानिक मच्छीमारांनी ही माहिती दिली तर मग त्यांना ही माहिती कोठून मिळाली? त्यांनी जर प्रत्यक्षात दहशतवाद्यांना असे करताना पाहिले असेल तर मग त्यांनी पोलिसांना याची माहिती का कळवली नाही? आणि जर पोलिसांना माहिती कळवली असेल तर मग पोलिसांनी एक्शन घेण्यासाठी उशीर का केला? एका प्रश्नापासून पुढचा प्रश्न यात तयार होतो आहे.

* त्याचवेळी ताजमधूनही मोठा साठा दहशतवाद्यांकडून हस्तगत करण्यात आला. हा साठा खूप मोठा होता व यात किमान पाच हजार जणांना ठार करण्याइतका तो होता, असे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच सांगितले होते. असे असेल तर मग हे दहशतवादी हातात साठा असतानाही तो न संपवता कमांडोंना का शरण गेले असतील? त्यांना मोठा संहारच करायचा होता तर तेवढ्या दारूगोळ्यात ते ताज हॉटेलही उडवून देऊ शकले असते. मग त्यांनी तसे का केले नसेल?

* त्याचवेळी आणखी एक महत्त्वाचा पैलू. एवढा मोठा दारूगोळा, शस्त्रसाठा त्यांनी ताजमध्ये हल्ल्यावेळीच नेला असे म्हणता येत नाही. हा शस्त्रसाठा बाळगत ते गोळीबार करतच हॉटेलमध्ये शिरले असतील असेही म्हणवत नाही. याचा अर्थ त्यांनी आधीच हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. त्यांना हॉटेलची जी माहिती होती, त्यावरूनही त्याचा अंदाज लावता येतो. असे असेल तर मग एवढा शस्त्रसाठा आत नेताना ताजचे सुरक्षा रक्षक काय करत होते? त्यांना जराही संशय आला नाही?

* याच प्रश्नांची आणखी एक बाजू. ताज आणि ओबेरॉयमध्ये दहशतवाद्यांनी व्हिडीओ टेप तयार करून आणि नकाशे मिळवून हा हल्ला केल्याचे आता पुढे आले आहे. असे असेल तर मग ताजचे नकाशे आणि ते पण अत्यंत चोख शिस्तबद्धरितीने
दहशतवाद्यांनी तयार कसे केले. त्यांना स्थानिक कर्मचार्‍यांची मदत मिळाली का? कारण कोणत्याही मोठ्या आणि महत्त्वाच्या हॉटेल्समध्ये छायाचित्र काढण्यापूर्वी किंवा चित्रीकरण करण्यापूर्वी व्यवस्थापनाची परवानगी लागतेच, निदान ताजमध्ये तरी लागतेच. मग दहशतवाद्यांनी हे काम कसे केले?

* नरीमन हाऊस हे अतिशय दाटीवाटीच्या भागात आहे. येथे दहशतवाद्यांना पळून जाण्याचीही संधी होती. या इमारतीतील दहशतवाद्यांच्या संख्येबाबतही नेमके कधीच कळलेले नाही. त्यामुळे खरोखरच येथून काही दहशतवादी पळून गेले असावेत काय?

* नरीमन हाऊस हे ज्यु धर्माचे ट्रस्टी चालवतात. तेथे शक्यतो ज्यू लोकांनाच ठेवले जाते. असे असेल तर मग मुस्लिमांना तिथे का ठेवण्यात आले असावे? ज्यू आणि मुस्लिमांमध्ये तर कट्टर शत्रूत्व आहे, हे पॅलेस्टाईन प्रकरणावरून लक्षात येतेच आहे. असे असेल तर दोन महिन्यांपासून हे अतिरेकी तेथे कसे रहात होते?

* मुंबईत विविध ठिकाणी स्फोट करण्यात आले. हे स्फोट टाइमबॉंबच्या माध्यमातून करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी कबूल केले आहे, याचाच अर्थ मुंबईत दाखल झाल्या झाल्या दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरुवात केली नसावी? त्यांनी आधी परिस्थितीची पाहणी केली असावी आणि मगच गोळीबार सुरू केला असावा. किंवा त्यांचे इतर साथीदार बॉम्ब ठेवण्याचे काम करत असतील. असे असेल तर मग त्यांचे इतर साथीदार याच काळात इतरत्र पसार झाले असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळतो.

* पोलिसांनी स्पष्ट केल्याप्रमाणे जर दहशतवाद्यांनी मुंबईत पाय ठेवल्या ठेवल्या गोळीबार सुरू केला तर मग टाइम बॉम्ब कुणी लावला? दहशतवादी दाखल होण्यापूर्वीच त्यांच्या स्थानिक साथीदारांनी हे बॉम्ब लावले असावेत का? या गटांशी कराचीहून आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध होता की नव्हता? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. असे असेल तर मग, मग मुंबई अजूनही सुरक्षित नाही असेच म्हणावे लागेल कारण ते बॉम्बं पेरणारे दहशतवाद्यांचे साथीदार मोकळे फिरताहेत.

* मुंबईतील विविध जागांवर हल्ले झालेत ते पण दहशतवाद्यांचे हल्ले हे माहीत असताना एनएसजी कमांडोंना उशिरा बोलावणे का धाडले? कमांडोंनाही मुंबईत यायला बराच वेळ लागला. यामागची कारणे काय?

* या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला आहे, यात डॉक्टर, पोलिस, ताजचे कर्मचारी, एनएसजी कमांडोसह अनेकांचा समावेश आहे, यात आणखी एक नाव आहे ते एका महिला पत्रकाराचे. या महिला पत्रकाराचा मृत्यू झाला तो हॉटेल ताजमध्ये. तिच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर मात्र त्याला रायगडचे नेटवर्क मिळत होते. हे कसे काय? की दहशतवादी तिचा मोबाईल घेऊन रायगडमार्गे पळाले?

* सीएसटीवर हल्ला करणार्‍या ज्या दहशतवाद्याचा फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाला त्या दहशतवाद्याच्या हातात लाल धागा दिसतो. हा धागा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बांधण्यात आला असावा काय? किंवा मग दहशतवादी गेल्या काही दिवसांपासून भारतात सुरू असलेल्या घडामोडींशी परिचित होते, आणि त्यांनी हिंदू दहशतवादी भासवण्याचा प्रयत्न केला असेल का?

अटक करण्यात आलेल्या कसाबने आता आपले तोंड उघडले असले तरी अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत. या प्रश्नांच्या गराड्यातच सध्या मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा तपास केंद्रीत आहे. लवकरात लवकर या सगळ्याचा उलगडा व्हावा हीच अपेक्षा.