शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (13:18 IST)

मुंबई इमारतीत आग: 19 व्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

मुंबईच्या लालबाग परिसरात एका उंच इमारतीला आग लागली आहे. अविघ्न पार्क इमारत असं या इमारतीचं नाव आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम या इमारतीच्या 19 व्या मजल्यावर सुरुवातीला आग लागली.
 
इमारतीच्या दोन्ही बाजूंनी ही आग पसरत असल्याचं दिसून येत आहे. आग काही प्रमाणात वरच्या बाजूला विसाव्या मजल्यावरही पोहोचल्याचं आढळून येत आहे.
 
लालबागचा हा परिसर चिंचोळ्या गल्ल्यांचा आहे. तसंच या परिसरात वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आग विझवण्याच्या कामात अडचणी येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
 
सकाळी 11 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास आगीची महिती अग्निशमन विभागाला मिळाली. सध्या अग्निशमन दलाचे 14 बंब तसंच इतर संबंधित पथके याठिकाणी दाखल झाली आहेत.
 
अग्निशमन दलाचे जवान इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मिळत आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान क्रेनच्या माध्यमातून वरपर्यंत पोहोचले आहेत. ते पाण्याचा मारा करत आहेत. पण आगीपर्यंत पाण्याचा फवारा पोहोचत नसल्याचं दिसून येतं.
 
एका व्यक्तीचा मृत्यू
अविघ्न इमारतीतून एक व्यक्ती पडतानाचं दृश्यही समोर आलं आहे. आगीमुळे बाहेर पडता येत नसल्याने इमारतीच्या 19 व्या मजल्याच्या गॅलरीत ही व्यक्ती लटकत होती. पण हात सुटल्यामुळे ही व्यक्ती खाली पडल्याचा व्हीडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे.
 
या व्यक्तीचं नाव अरूण तिवारी असून त्याचं वय 30 वर्षे असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
 
मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक
अविघ्न पार्क इमारत ही मुंबईतील सर्वाधिक उंच इमारतींपैकी एक मानली जाते. अनेक उच्चभ्रू लोक मोठ्या प्रमाणावर या इमारतीत राहतात.
 
एकूण 64 मजली ही इमारत असून करी रोड स्थानकाजवळ महादेव पालव मार्गावर अतिशय मोक्याच्या ठिकाणी ही इमारत बांधण्यात आलेली आहे. या इमारतीतील घरांची किंमत 13 कोटींच्या घरांत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.