रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (20:57 IST)

औरंगाबाद खंडपीठात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, फोन करणाऱ्याला हैदराबाद येथून अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला आणि एकच खळबळ उडाली. धमकीच्या फोननंतर तत्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथक न्यायालयात पोहोचले. या पथकाने न्यायालयाचा कोपरांकोपरा पिंजून काढला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाला न्यायालय परिसरात बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू आढळली नाही.
 
औरंगाबाद पोलिसांनी अज्ञाताविरोधात याचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन कोणी केला याचा शोध पोलीस घेत आहेत. औरंगाबाद येथील पोलीस नियंत्रण कक्षाला मंगळवारी सांयकाळी पावणे सहाच्या सुमारास हा निनावी फोन आला. उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. या फोनमुळे सुरक्षा यंत्रणा सर्तक झाली. उच्च न्यायालयात तत्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथक पाठवण्यात आले. या पथकाने न्यायालय परिसरात बॉम्ब शोध घेण्यास सुरुवात केली. न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, वकील व पक्षकार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण होते. शोध मोहिमेत या पथकाच्या हाती काहीच लागले नाही. बॉम्ब सदृश्य कोणतीही संशयास्पद वस्तू या पथकाला सापडली नाही. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
 
पोलिसांनी या निनावी फोनसंदर्भात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.  तपास करत पोलिसांनी हा फोन करणाऱ्याला हैदराबाद येथून अटक केली. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor