बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (16:03 IST)

अनैतिक संबधातून बारबालेचा खून !

मुंबईच्या डोंबिवलीत अनैतिक संबधातून बारबालेचा गळा दाबून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल सीडीआरद्वारे हत्येचा उलगडा करत पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरती अरूण सकपाळ (वय 47, रा. डोंबिवली) असे खून झालेल्या बारबालेचे नाव आहे. तर श्रीनिवास बसवा मडीवाल (वय 34, रा. रूचिरा बार, कल्याण, मूळगावः रा. थोमबाटू, जिल्हा : उडपी, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथे राहणा-या आरती सपकाळ हीचा शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरात साडीने गळा आवळून खून झाला होता. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली सुरु होता. दरम्यान मयत आरती काम करत असलेल्या कल्याणच्या रूचिरा बार येथे काम करणारा श्रीनिवास मडीवाल याच्यावर पोलिसांची संशयाची सुई स्थिरावली. आरतीच्या मोबाईलचा सीडीआर तपासला. त्यात तिच्यासोबत बारमध्ये करणारा तिचा सहकारी श्रीनिवास मडीवाल याच्याशी दररोज बोलणे होत असल्याचे उघडकीस आले. आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून त्याला कल्याण स्टेशनच्या पुलावरून ताब्यात घेतले. अशाप्रकारे आरतीच्या खुन्याच्या गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या. आर्थिक आणि अनैतिक संबंधातून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. विष्णूनगर पोलिस तपास करत आहेत.