1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Bombay University Degree and Post Graduate examinations have been postponed

मुंबई विद्यापीठाच्या 'या' कारणामुळे पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांना देण्यात आली स्थगिती

मुंबई विद्यापीठाच्या ३ फेब्रुवारीपासून होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठातील कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल या सर्व संघटनांची बैठक झाली. दरम्यान, 2 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या 10 परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत.
 
शैक्षणिक वर्ष 2022-2023 च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 हिवाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा विविध केंद्रांवर सुरू आहेत. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.
 
या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीने २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे परीक्षेत अडचणी निर्माण झाल्यामुळे मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातर्फे ३ फेब्रुवारीपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.
Edited by: Ratnadeep Ranshoor
पुढील लेख
अजित पवारांविषयी बोलताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली