गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जुलै 2024 (13:18 IST)

उरणमध्ये तरुणीची निर्घृण हत्या, टॅटू आणि कपड्यांवरून पटवली ओळख, आरोपी कर्नाटकातून ताब्यात

arrest
मुंबईजवळील उरणमध्ये 20 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या प्रकरणात आरोपी दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातून आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांची चार पथके गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होती.
27 जुलै 2024 रोजी पहाटे उरण येथे राहणाऱ्या यशश्री शिंदे या तरुणीचा मृतदेह पोलिसांना आढळला होता.
यशश्रीच्या मृतदेह भयावह अवस्थेत आढळल्याचं सांगितलं जात असून तिच्या पाठीवर आणि पोटावर चाकूने वार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उरण आणि आसपासच्या परिसरात पडले असून स्थानिकांनी 28 जुलै रोजी उरण बंदची हाक दिली होती.
या प्रकरणी यशश्रीच्या कुटुंबीयांनी दाऊद शेख या इसमावर हत्या केल्याचा आरोप केला होता.
 
नेमकं काय घडलं?
यशश्री शिंदे आपल्या कुटुंबासह उरण येथे राहत होती. ती एका खासगी कंपनीत कामाला जात होती.
25 जुलै रोजी ती कामावरून परतली नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
उरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी रात्री दोन वाजता पोलिसांनी शेतात एक मृतदेह आढळल्याची माहिती देणारा फोन आला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यशश्रीच्या कुटुंबीयांना तिच्या शरीरावरील टॅटू आणि कपड्यावरून तिची ओळख पटली. तिच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "दाऊद शेखवर आमचा संशय आहे. 2019 साली त्याच्याविरुद्ध पाॅस्कोअंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला होता. तो आमच्या मुलीला त्रास देत होता. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे."

आरोपीला पकडण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल नेहुल यांनी सांगितलं होतं की, "आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या चार टीम्स वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत. 48 तासांत आरेपीबाबत चित्र स्पष्ट होईल,तोपर्यंत तपासाबाबत माहिती उघड करू शकत नाही."
 
2019 मध्ये दाऊदविरोधात कुटुंबियांनी गुन्हा दाखल केला होता. ज्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याने मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
 
दोघांची ओळख कशी झाली?
2019 साली यशश्री आणि दाऊद यांची एका कंपनीत ओळख झाली. ते एकाच ठिकाणी काम करत होते अशी माहिती समोर येत आहे.परंतु तो तिला त्रास देत होता असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं असून तिच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलीस तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी 2019 मध्ये यशश्री अल्पवयीन असल्याने लैंगिक गुन्ह्यापासून लहान मुलांचे संरक्षण करणाऱ्या पॉस्को कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
 
आरोपीला अटक, पोलीस काय म्हणाले?
आरोपीला अटक केल्यानंतर नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकारे यांनी माहिती देताना सांगितलं की, "गुरुवारपासून (25 जुलै) घटनेला पाच दिवस झाले. आरोपीचा शोध सुरू होता. आम्ही दोन ते तीन संशयित स्पाॅट केले होते. नवी मुंबई आणि कर्नाटक या दोन ठिकाणी पथक पाठवले होते. कर्नाटकमध्येही बंगळुरू आणि शहापूर जिल्हा याठिकाणी दोन टीम पाठवल्या होत्या. आज सकाळी मुख्य संशयित दाऊद शेख याला ताब्यात घेतलेलं आहे.
 
"सुरुवातीला आरोपीचं लोकेशन ट्रेस होत नव्हतं. तो कर्नाटकमध्ये आहे एवढी माहिती होती. त्याच्याविषयी त्याच्या घरी, नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली. त्याच्या मित्रांनी आम्हाला माहिती दिली. त्याच्या आधारे कर्नाटकमधील शहापूर इथून त्याला आम्ही अटक केली. मुख्य आरोपीने कबुली दिलेली आहे. दुसरा कोणताही संशयित सध्या नाहीय."
 
"पीडित मुलगी आणि आरोपी यांच्यात ओळख होती. मैत्री होती. मागील तीन ते चार वर्षं मयत मुलगी त्याच्या संपर्कात नव्हती. यातूनच त्याने हे केलं असण्याची शक्यता आहे. दोघांचा त्यादिवशी संपर्क झाला. दोघांनी घटना घडली तिथेच जवळपास भेटण्याचं ठरवलं. अपहरण केलेलं नाहीय. दोघंही एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये वाद झालेला असावा असं आम्हाला वाटतं,"
 
दाऊद शेख आणि यशश्री हे दोघंही पूर्वी उरणमध्ये जवळपासच राहत होते. एकाच कंपनीत कामाला होते. 2019 मध्ये दाऊदवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तो कर्नाटकला गेला. तिकडे तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता.
 
Published By- Priya Dixit