शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (21:27 IST)

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २५ मार्चदरम्यान मुंबईत

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज  होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत  हा निर्णय घेण्यात आला.
 
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थिती) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानपरिषद आणि विधानसभा  कामकाज सल्लागार समितीचे सदस्य वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.
 
सन 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प दि. 11 मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे.  अधिवेशनाच्या सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.