मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (16:05 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजरामर भूमिका साकारणारे, दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी,चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
 
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारतीय चित्रपट सृष्टीच्या लौकिकात भर घालणारी, त्याला सातासमुद्रापार नेणारी अशी दिलीप कुमार यांची कारकिर्द आहे. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नेहमीच्या जगण्यातही त्यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणे  चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवला आणि वाढवला.

मेहनतीच्या जोरावर कला क्षेत्रात स्थान निर्माण करता येते, असा संदेश देणारी त्यांची वाटचाल होती. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा स्नेहबंध होता. कला क्षेत्राविषयीची आत्मियता हा अतूट धागा या दोघांमध्ये होता. अजरामर भूमिका साकारणारे चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामरच राहील. त्यांच्या निधनामुळे रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.