गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (16:17 IST)

मुंबईत कोरियन महिलेचा विनयभंग, ही घटना पाहात बसणाऱ्यांवर संतापून चित्रा वाघ म्हणाल्या...

chitra wagh
मुंबईत घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाचंच नाही तर परदेशातील माध्यामांचंही लक्ष वेधून घेतलं आहे. दोन तरुणांनी यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करणाऱ्या एका कोरियन मुलीचा विनयभंग केल्य़ाची ही घटना आहे.
 
ती मुलगी व्हीडिओचं चित्रिकरण करताना हजाराहून अधिक लोक तेथे होते, मात्र त्या त्रास देणाऱ्या तरुणांना तिच्यापासून दूर करण्यासाठी कोणीही मदत केली नाही अशी माहिती सोशल मीडियात व्यक्त होत आहे. ट्वीटरसारख्या समाजमाध्यमात काही लोक संतापही व्यक्त करत आहेत.
 
याप्रकरणी मोबिन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्री आलम अन्सारी अशी या दोघांची नावे असून त्यांच्यावर या कोरियन मुलीचा विनंयभंग केल्याबद्दल खार पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा नोंदवला आहे.
 
ट्विच या लाइव्हस्ट्रीमिंग सर्व्हिसवर विनयभंग झालेल्या मुलीचे 12,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. त्या व्हीडिओ गेम खेळताना आणि नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेतानाचे व्हीडिओ पोस्ट करतात.
 
त्या भारतात गेले काही आठवडे वास्तव्यास आहेत आणि लाइव्ह व्लॉग्सच्या माध्यमातून आपला अनुभव सांगत आहेत.
 
मंगळवारी त्या खार परिसरात भटकंती करत होत्या. एकीकडे आपल्या फॉलोअर्सशी संवाद साधतानाच दुसरीकडे त्या रस्त्यावरील लोकांशीही गप्पा मारत होत्या. तेव्हा एक पुरुष त्यांच्याजवळ आला.
 
व्हीडिओत दिसते की त्या पुरुषाने त्यांचा दंड पकडला आहे आणि आपल्या मोटरबाइकवर त्यांना खेचण्याचा प्रयत्न करत आहे. तो त्यांच्या गालाचे चुंबन घेण्याचाही प्रयत्न करत आहे.
 
या प्रकाराने त्या घाबरल्या, त्याच्यापासून दूर झाल्या आणि "आता घरी जायची वेळ आली आहे.", असे त्या स्ट्रीमिंग करत म्हणाल्या. पण त्या इसमाने व त्याच्या मित्राने बाइकवरून त्यांचा पाठलाग सुरू ठेवला आणि त्यांचा फोन नंबर मागितला.
 
अखेर तिथे दुसरा एक इसम आला आणि त्या दोघांना थांबण्यास सांगितले. या व्हीडिओत त्या धावताना दिसतात. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण सुरक्षित असल्याचे सांगत त्यांनी व्हीडिओचा शेवट केला.
 
त्यांनी नंतर या प्रसंगाची क्लिप इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून पोस्ट केली. 'प्रकरण गंभीर होऊ नये' म्हणून त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले, अशी कॅप्शन दिली आहे.
 
त्या असेही म्हणाल्या की, प्रतिक्रिया देणाऱ्या काहींनी त्यांनाच या छळवणूकीसाठी कारणीभूत धरले. कारण त्या खूपच मैत्रीपूर्ण वर्तन करत होत्या आणि तो इसम त्यांच्या जवळ आला तेव्हा त्यांनी (तरुणीने) संभाषण सुरू केले. पण इतरांनी या तरुणीची बाजू घेतली आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितले.
 
 बुधवारी एका ट्विटर युझरने ही क्लिप शेअर केली. या वर्तणुकीला 'तिरस्करणीय' असे म्हटले.
 
युझरने मुंबई पोलिसांनाही टॅग केले आणि या प्रसंगातील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, असेही म्हटले. 
 
त्यानंतर पोलिसांनी युझरशी व संबंधित मुलीशी यांच्याशी ट्विटरवर संपर्क साधला आणि या प्रसंगाबद्दल अधिक तपशील मागितला. त्यानंतर पुरुषांच्या पेहेरावाचे वर्णन ट्विट केले व पुढील कारवाई झाली.
 
भाजपा महिलामोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही त्यांनी केले आहे.
 
 चित्रा वाघ म्हणाल्या, “ही अत्यंत दुःखद घटना आहे. मुंबईसारख्या शहरात ही घटना आहे. विकृत लोकांनी त्या महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचा सन्मान झाला पाहिजे. मुंबई पोलिसांनी काही तासांत त्या लोकांना पकडलं याबद्दल त्यांचं अभिनंदन. ही घटना सुरू असताना आजूबाजूला लोक होते, त्यांनी मदत केल्याचं दिसत नाही. येणाऱ्या काळात अशी घटना घडत असेल तर लोकांनी पाहात बसण्यापेक्षा त्या महिलेला मदत केली पाहिजे” 
 
विनयभंग म्हणजे काय?
भारतीय दंड संहितेत कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो.
 
यामध्ये प्रामुख्याने एखाद्या महिलेशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे किंवा तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, या प्रकाराला विनयभंग असं म्हटलं जातं.
 
विनयभंगाच्या बाबतीत अनेक उप-कलमांचाही कायद्याचे जाणकार उल्लेख करतात.
 
ज्येष्ठ वकील असीम सरोदे सांगतात, "कलम 354 अंतर्गत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास आणि ते सिद्ध झाल्यास 1 ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.कलम 354-अ अंतर्गत, एखाद्या महिलेशी शारीरिक जवळीक साधण्यासाठी बळजबरी करणे, याचा समावेश विनयभंगामध्ये होतो.
 
यापद्धतीचा गुन्हा शिक्षा झाल्यास 3 वर्षांची शिक्षा होते.कलम 354-ब अंतर्गत, एखाद्या महिलाचा विनयभंग करण्यासाठी तिच्यावर हल्ला केल्यास आणि गुन्हा सिद्ध झाल्यास 3 ते 4 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते."
 
सरोदे पुढे सांगतात, “कायद्यात उद्देश अत्यंत महत्त्वाचा असतो. एखाद्या ठरावीक उद्देशाच्या दृष्टीने कृती केली, तर तो गुन्हा ठरू शकतो."

Published By -Smita Joshi