उद्धव ठाकरे हवा तो मतदारसंघ निवडा अन् माझ्याविरोधात जिंकून दाखवा
मुंबई : खासदार नवनीत राणा (navneet rana) यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मी माझ्या संपूर्ण भारतातील जनतेला आणि ठाकरे सरकारला विचारू इच्छितो की, मी कोणती चूक केली ज्यासाठी मला शिक्षा झाली. हनुमान चालीसा पठण करणे हा गुन्हा असेल तर मी 14 वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे. तरी देखील मी पुन्हा उभी राहीन. यापुढे माझा लढा सुरुच राहणार आहे. उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray)माझे आव्हान आहे की, त्यांनी माझ्याविरोधात कोणताही मतदारसंघ निवडून जिंकून दाखवावे, असे आव्हान नवनीत राणा यांनी ठाकरेंना दिले आहे.
राणा म्हणाल्या, येणाऱ्या निवडणुकीत मी पूर्ण क्षमतेने जनतेत जाणार आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांना दाखवून देईल की, हनुमान आणि प्रभू श्री रामाचं नाव घेणाऱ्यांना त्रास दिल्याचा काय परिणाम होतो. मी न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करत आहे. पण जो अन्याय माझ्यावर झालाय त्याच्याविरोधात मी आवाज उठवत राहणार. मी कोणता गुन्हा केला ज्याची मला शिक्षा मिळाली. क्रूर बुद्धीने महिलेवर, लोकप्रतिनिधीवर कारवाई करण्यात आली. केसवर मी बोलणार नाही. माझ्यावर जो अन्याय झाला, तुरुंगात ते पोलीस ठाण्यात त्यावर मी लवकरच बोलणार आहे.
उद्धव ठाकरेंनी लोकांसमोर येऊन निवडणूक लढवून दाखवावी. महिलेची ताकद काय आहे हे मी दाखवून देईन. त्यांनी माझ्याविरोधात कोणताही मतदारसंघ निवडावा, त्यांच्याविरोधात मी उभी राहणार आहे. महाराष्ट्राची जनता माझ्यावर झालेल्या अत्याचाराचे उत्तर देईल. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने लढा देणार आहे, असे आव्हान राणा यांनी शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले आहे.