शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (09:49 IST)

अखेर हिंदमाता येथे पालिकेकडून नवा प्रकल्प

मुंबईत हलकासा पाऊस पडला तरी दादरच्या हिंदमाता परिसरात जलकोंडी होते. येथील जलकोंडी मिटवण्याचा गेली अनेक वर्ष प्रयत्न होत असले तरीही तेथील पाणी साचण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही. यावर उपाय म्हणून मुंबई महानगर पालिकेने आणखी प्रयत्न करायचे ठरवले आहे. 
 
मुंबई महापालिकेकडून हिंदमाता येथे भूमिगत टाक्या बांधण्यात येत असून या टाक्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी या टाक्याचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी या कामाची पाहणी केली. आदित्य ठाकरे यांनी नगरसेविका उर्मिला पांचाळ, AMC वेलारुसु, HE खात्याचे इंजिनिअर्स यांच्यासह प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता उड्डाणपूल, सेंट झेवियर्स मैदान येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
 
दिलेल्या वेळआधी काम पूर्ण होत आले असून पावसाळ्यापूर्वी या टाक्या तयार असतील. या टाक्यामुळे हिंदमाता येथील पूरस्थिती कमी होणार असल्याचं शिवसेना नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी म्हटलं आहे. या टाक्यामध्ये अतिवृष्टीच्या काळात पावसाचे पाणी 3 तास साठवण्याची क्षमता असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
 
हिंदमाता परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचारा करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. तीन ठिकाणी भूमिगत टाक्‍या बांधण्यात आल्या आहेत. या परिसरातील संत झेव्हिअर्स मैदानात भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे. त्यानंतर हे पाणी परळपासून दादर पश्‍चिमेकडील स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यानात आणण्यात येणार आहे. येथेही भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे.