चार वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू
गोरेगाव पूर्व येथे चार वर्षाच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूल मध्ये बुडून दुर्देवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहीर चिराग शहा असे या मयत मुलाचे नाव आहे. हा मुलगा पोहण्यासाठी शिकायला जात होता. घटनेच्या दिवशी मुलाची आई ट्रेनरशी बोलत होती.
गोरेगावच्या दिंडोशी येथील उच्चभ्रू लोकवस्तीत वास्तव्यास असलेले शहा कुटुंबातील चार वर्षाच्या मुलाला घेऊन त्याची आई स्विमिंगच्या शिकवणीसाठी घेऊन गेली होती. मुलाची ट्रेनींग झाल्यावर त्याची आई ट्रेनरशी बोलत असताना पुलाच्या कठड्यावरून हा चिमुकला चालत असताना त्याचा पाय निसटला आणि तोल जाऊन तो स्विमिंग पुलात पडला. बऱ्याच वेळ झाली मुलगा कुठे ही दिसला नाही तेव्हा शोधाशोध झाली आणि तो पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. त्याला तातडीनं बाहेर काढण्यात आलं. आणि रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर मयत मुलाच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला असून स्थानिक रहिवाश्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.