राणा दाम्पत्य आज न्यायालयात हजर
मुंबई पोलीस आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना आज वांद्रे न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
या दोघांवर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 135 अ, 34, r/w 37(1) 135 नुसार कारवाई करण्यात आली.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी मुंबईतील खार परिसरातून अटक केली आहे. त्याच आज मुंबई पोलीस राणा दाम्पत्याला वांद्रे हॉलिडे कोर्टात हजर करणार आहेत. त्याच्यावर वेगवेगळ्या गटांमध्ये द्वेष पसरवल्याचा आरोप आहे.
काल दुपारी राणा यांनी आपली मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याची मोहीम मागे घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर संध्याकाळी पोलिसांनी त्यांना खार पोलीस ठाण्यात नेलं आणि त्यांना अटक करण्यात आली.
'उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली आपल्यावर खोटा गुन्हा दाखल होत असल्याचे' सांगत राणा दाम्पत्यानं जामीन नाकारला. त्यामुळे या दोघांना कालची रात्र तुरुंगातच काढावी लागली.
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर कारवाई झाल्यावर त्या दोघांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभेचे खासदार संजय राऊत, परिवहनमंत्री अनिल परब आणि शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली.
तत्पूर्वी शिवसेना कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर आंदोलन केले. त्यांच्या निवासस्थानाबाहेर शेकडो कामगार दिसले. दरम्यान, नवनीत आणि तिचा पती रवी राणा यांना पोलिसांनी खार पोलीस ठाण्यात नेले. यावेळी नवनीतने सांगितले की, आम्हाला जबरदस्तीने येथे आणण्यात आले आहे.
आम्ही फक्त हनुमान चालिसा म्हणायला आलेलो होतो, मात्र आमच्या जीविताला धोका पोहोचेल अशी कृती करण्यात आल्यामुळे या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं राणा दाम्पत्याने म्हटलं आहे. आम्हाला मारहाण केल्यावर रुग्णालय़ात नेण्यासाठी रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली होती, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
आम्हाला जीवे मारण्याच्या उद्देशाने लोक घरासमोर जमले होते.आपल्या जिविताला काही झालं तर हे तिघे जबाबदार असतील असंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात नेण्यात आल्यावरही दोन्ही राणा यांनी आपली आक्रमक भूमिका दाखवली. यावेळेस त्यांनी अत्यंत संतप्त होत सरकारचा निषेधही केला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे.
राणा दाम्पत्याला पोलीस ठाण्यात नेल्यावर भाजपाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली. सरकारने पोलिसांच्या बळाचा गैरवापर केल्याचं मत या दोघांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.