केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती लस घ्या : पालिका आयुक्त
मुंबईत कोविशिल्ड लस देण्यास सुरुवात केली आहे. तर सोमवारपासून मुंबईमध्ये भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लसही उपलब्ध करण्यात आली आहे. कोव्हक्सिन लस कोरोनावर सर्वांत जास्त प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लोकांनीही हीच लस देण्याची मागणी केली आहे. मात्र लसींबाबत मनात कोणताही शंका न ठेवता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती लस घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी केले आहे.
देशभरात कोरोनावर प्रभावी असणाऱ्या कोविशिल्ड आणि कोव्हक्सिन लस देण्यात येत आहे. मात्र यातील कोणती लस सर्वात जास्त प्रभावी आहे याबाबत लोकांच्या मनात अनेक शंका असल्याचे दिसून आले. लसीकरणाबाबत कोणतीही शंका न बाळगता लस घ्या असे आवाहन पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री त्याचप्रमाणे अनेक जणांनी केले आहे. मात्र लसीकरण केंद्रावर जाऊन कोणती लस घ्यायची हा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर त्या क्षणी जी लस उपलब्ध तिच लस लोकांनी घ्यावी असे आवाहन शुक्रवारी आयुक्त इकबाल चहल यांनी केले.
आपण पाहिले तर १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविशिल्ड लस तर १५ मार्चपासून सुरु झालेल्या लसीकरणात भारत बायोटेकची कोव्हक्सिन लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली. सध्या देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. तर राज्यात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. लोकांनी न घाबरता लस घेण्याचे आवाहन केले जात आहे.