शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 6 मे 2021 (11:31 IST)

दुसऱ्या दिवशी टोकन दिलेल्या नागरिकांना प्रथम प्राधान्य द्या

मुंबईत लसीकरण केंद्रांवर होत असलेल्या गर्दीवर उपाययोजना म्हणून लसीकरण केंद्रांवर किती व्यक्तींना लस मिळेल, याबाबतची माहिती डिजिटल फलकाद्वारे नागरिकांना देण्यात यावी. तसेच, ज्या नागरिकांचे लसीकरण आज होणे शक्य नाही, परंतु जे नागरिक लसीकरण केंद्रांवर आलेले आहेत त्यांना दुसऱ्या दिवशीचे टोकन देण्यात यावे. दुसऱ्या दिवशीसुद्धा या टोकन दिलेल्या नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी  प्रशासनाला दिले आहेत.
 
पालिका शिक्षण समिती अध्यक्षा व शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या चारकोप सेक्टर ३, मधील चारकोप प्रसतीगृह येथील लसीकरण केंद्राचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी, महापौरांनी वरीलप्रमाणे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 
 
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते फित कापून लसीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर महापौरांनी संपूर्ण लसीकरण केंद्राची पाहणी केली. लसींचा मर्यादित स्वरूपात पुरवठा होत असल्यामुळे सद्यस्थितीत लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. लसीकरण केंद्राकडून लघुसंदेश प्राप्त झाल्यानंतरच तसेच लसीची उपलब्धता याची खातरजमा केल्यानंतरच नागरिकांनी घराबाहेर पडणे योग्य राहील, असे महापौरांनी म्हटले आहे.
 
सद्यस्थितीत नागरिकांच्या दुसरा डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. लसीकरण केंद्रांवर किती नागरिकांचे लसीकरण आज होऊ शकेल ? याची माहिती दर्शविणारा डिजिटल माहिती फलक लावण्यात यावा. जेणेकरून २०० नागरिकांचे लसीकरण होऊ शकेल, एवढी लस उपलब्ध असताना चारशे नागरिकांना उपस्थित रहावे लागणार नाही. तसेच ज्या नागरिकांचे लसीकरण आज होणे शक्य नाही, परंतु जे नागरिक लसीकरण केंद्रांवर आलेले आहेत त्यांना दुसऱ्या दिवशीचे टोकन देण्यात यावे.दुसऱ्या दिवशीसुद्धा या टोकन दिलेल्या नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, असे आदेशही महापौरांनी यावेळी दिले.
 
कोणत्याही नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवणार नसून ज्या प्रमाणात लसींचा पुरवठा होईल त्या प्रमाणात लसीकरणाचा वेग वाढेल,असा विश्वासही महापौरांनी यावेळी व्यक्त करून नागरिकांनी या संपूर्ण लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन केले.