येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस, ठाण्यात वीज पडून 2 जखमी, 5 गुरे ठार
मुंबईत पुन्हा एकदा ढगांचा लपंडाव सुरू झाला आहे. येत्या 48 तासांत मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. मान्सूनचे वारे शहरात पोहोचल्याने बुधवारी अनेक भागात पाऊस झाला. येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि ठाण्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणात अनेक दिवसांनी मान्सूनचे ढग दाखल झाले आहेत. आज मुंबई आणि ठाण्यात विविध ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बुधवार सकाळपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अनेकवेळा हलका ते मध्यम पाऊस झाला. तर ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यादरम्यान वीज पडून पती-पत्नी जखमी झाले आहेत. तर पाच गुरे मरण पावली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास शाहपूर येथील कडाचीवाडी येथे ही घटना घडली. शहापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख वसंत चौधरी यांनी सांगितले की, विजेचा धक्का लागून 60 वर्षीय व्यक्ती आणि त्याची 45 वर्षीय पत्नी जखमी झाले आहेत.
सध्याच्या हवामान प्रणालीनुसार मुंबई, ठाणे, पालघरमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईच्या कुलाबा हवामान केंद्रात 13.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर सांताक्रूझ हवामान केंद्रात बुधवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या गेल्या 24 तासात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे, असे IMD डेटाने दाखवले आहे.
26, 27 आणि 30 जून रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार (64.5-115.5 मिमी) ते अतिशय जोरदार (115.5-204.4 मिमी) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.