शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (08:40 IST)

नवी मुंबई आयुक्तांकडून महत्त्वपूर्ण सूचना जारी

नवी मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये नियम न पाळणाऱ्या कार्यालयांविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे. त्यानुसार एखाद्या कार्यालयाने पहिल्यांदा नियम मोडला तर 50 लाखांचा दंड आकारला जावा, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास ते कार्यालय सील करण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
 
नियमांची त्रिसूत्री न पाळणाऱ्यांना कोव्हिडचा धोका आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रतिबंधात्मक उपाय करत आहे. मार्केटमध्ये अथवा गर्दीच्या ठिकाणी फिरताना मास्क न वापरल्याने कोरोना होऊ शकतो. याशिवाय आपल्यामार्फत इतरांनाही त्याची बाधा होऊ शकते. त्यामुळे महापालिका उपाययोजना करून अंमलबजावणी करत आहे. यासाठी महापालिकेने 155 जणांचे कारवाई पथक तयार केलं आहे.
 
महापालिकेचं पथक 24 तास गस्त घालत आहेत. या पथाकामार्फत मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. नियमांचा भंग केल्यामुळे गेल्या 11 दिवसात 4377 व्यक्ती आणि आस्थापना यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर 25 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
 
कारवाई करत असताना पारदर्शकता असावी. तसेच कोणी नियमावलीचा गैरफायदा घेऊ नये. त्यामुळे कुठल्या पद्धतीची उल्लंघन झाले आणि किती दंड भरावा लागणार याबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे. आस्थापनानी (कार्यालयांनी) नियमांचा भंग केल्यास पहिल्यांदा पन्नास हजार दंड, नियमांचा भंग केल्यास आस्थापना सात दिवसांसाठी सील तर तिसऱ्यांदा भंग झाल्यास कोरोना असेपर्यंत आस्थापना सील करण्यात येईल.