1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (21:58 IST)

महत्वाची बातमी, मध्य रेल्वेवर ७२ तासांचा मेगा ब्लॉक सुरू; १००हून अधिक गाड्या रद्द

Important news
मुंबईच्या मध्य रेल्वेवर तब्बल ७२ तासांचा मेगा ब्लॉक सुरू झाला आहे. मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कळवा आणि ठाणे येथील कट आणि कनेक्शनच्या कामासाठी हा मेगाब्लॉक करण्यात येत आहे. त्यामुळे १००हून अधिक गाड्या रद्द झाल्या आहेत. त्याचा थेट फटका मुंबई, नाशिक आणि पुणे मार्गावरील प्रवाशांना बसत आहे.
 
रेल्वे मार्गांच्या विविध तांत्रिक तसेच देखभालींच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतो. रेल्वे विभागाकडून याविषयी पूर्वसूचना देण्यात येत असते. आता पुन्हा मध्य रेल्वेकडून याविषयी पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यानुसार आजपासून हा मेगाब्लॉक सुरु झाला आहे. येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत हा जम्बो मेगा ब्लॉक ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असणार आहे. शंभरपेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एकूण ३५० रेल्वे या काळात धावणार नाहीत. कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी, तेजस, एसी डबल डेकर, याबरोबरच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेससह सर्व गाड्या हे तीन दिवस बंदच राहणार आहेत.
 
रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी मध्य रेल्वेने अनेकदा मेगा ब्लॉक केले आहेत. गेल्या महिन्यात २२ आणि २३ जानेवारीलाही एक ब्लॉक घेण्यात आला होता. आता हा दुसरा ब्लॉक असणार आहे. ७२ तासांच्या ब्लॉकनंतरच पाचवी आणि सहावी मार्गिका पुन्हा पूर्ववत कार्यरत करण्यात येणार आहे. असे असले तरी अजूनही दोन मेगाब्लॉक शिल्लक असल्याची माहितीदेखील रेल्वेकडून देण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन रोजच्या प्रवासासाठी अतिशय महत्त्वाची आहे. या सर्व लोकल ट्रेनचे मार्ग या काळात बदलण्यात आल्या आहेत. फास्ट लोकल या काळात स्लो लोकलच्या मार्गावर वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.