९ ऑगस्ट रोजी मुंबईत जंबो ब्लॉक, अनेक लोकल ट्रेन्स रद्द
पश्चिम रेल्वेतर्फे अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे, रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी वांद्रे टर्मिनस आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान हार्बर लाईनवर जंबो ब्लॉक लागू करण्यात येईल. हा ब्लॉक अप आणि डाउन दोन्ही हार्बर लाईनवर सकाळी १०:३० ते दुपारी ३:३० पर्यंत लागू राहील.
पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागानुसार, अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओएचई (OHE) देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक लागू करण्यात येत आहे. या काळात प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-वांद्रे-सीएसएमटी आणि सीएसएमटी/पनवेल-गोरेगाव-सीएसएमटी/पनवेल हार्बर मार्गावरील सर्व रेल्वे सेवा रद्द केल्या जातील . पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-गोरेगाव-चर्चगेट मार्गावरील काही धीम्या लोकल गाड्या देखील स्थगित केल्या जातील.
रेल्वेने सांगितले आहे की, उपनगरीय विभागातील रद्द झालेल्या गाड्यांची संपूर्ण यादी संबंधित स्थानकांवरील स्टेशन मास्तरांकडे उपलब्ध असेल. प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी ब्लॉक लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे काळजीपूर्वक नियोजन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा. देखभाल दुरुस्तीचे काम वेळेवर पूर्ण करता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सहकार्याचे आवाहन केले आहे.
Edited By - Priya Dixit
