महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुढच्या महिन्यात जाहीर होणार वेळापत्रक
राज्य सरकारमधील विविध विभागातील रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याच्या आदेशानंतर आता आयोगाने पटापट सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. मागणीपत्र प्राप्त झाल्यास येत्या नोव्हेंबर महिन्यात पुढच्या वर्षात घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं आयोगाने सांगितलं असून तसेच प्रलंबित निकाल ३० सप्टेंबरपर्यंत लावण्याचे देखील नियोजन आयोगाकडून केलं जात आहे.परिपत्रक जारी करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही माहिती दिली आहे.
राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्त पदांची माहिती ३० सप्टेंबरपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं द्यावी, अशा सूचना विभागांना देण्यात आल्याचं सांगितलं होतं. सरकारच्या या आदेशानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगदेखील कामाला लागला आहे. एमपीएससीकडून ऑक्टोबर महिन्यात पुढील वर्षाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित निकालदेखील ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे एमपीएससीचे नियोजन आहे. विशेष म्हणजे एमपीएससीने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.
अजित पवार यांनी वेगवेगळ्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात भाष्य केलं होतं.“मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या विभागाच्या जागा भरायच्या आहेत.त्या जागांची माहिती एमपीएससीला कळवायची आहे. ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांना सांगितलं आहे. जागांची माहिती द्या,अशा सूचना दिल्या आहेत.आरक्षण आणि इतर नियमांचं पालन करुन याद्या द्याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विभागांकडून याद्या आल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला माहिती दिली जाईल. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील”, असं अजित पवार म्हणाले होते.