बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (15:55 IST)

ठाण्यातील हे मराठी कुटुंब नेपाळच्या विमान अपघातात बेपत्ता

Nepal plane crash
नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात ठाण्यातील वैभवी बांदेकर त्यांची दोन मुलं आणि पती बेपत्ता झाले आहेत. 
 
ठाण्यातील माजिवाडा भागातील रुस्तमजी अथेना इमारतीत वैभवी त्यांचा मुलगा धनुष (22) मुलगी रितिका (15) आणि वृ़द्ध आईसोबत रहातात. वैभवी आणि त्यांचे पती अशोक त्रिपाठींचा घटस्फोट झालाय. 
 
या दुर्घटनेबाबत वैभवी बांदेकर यांच्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 
 
बीबीसी नेपाळीला दिलेल्या माहितीत, नागरी उड्डाण मंत्रालयाने विमानाचे अवशेष मिळाले असून 14 मृतदेह मिळाल्याचं स्पष्ट केलंय.
 
कुठे रहातात वैभवी बांदेकर?  
नेपाळमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत चार भारतीय असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर, हे कुटुंब ठाण्यातील असल्याचं स्पष्ट झालं. 
 
वैभवी ठाण्यात रहात असल्याने कापुरबावडी पोलिसांनी त्यांच्या घरी भेट देऊन घटनेची चौकशी सुरू केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे सांगतात, "घटस्फोटानंतर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हे कुटुंब 10 दिवस एकत्र वेळ घालवतं. दरवर्षी ते फिरायला जातात."  
 
वैभवी बांदेकर मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पेक्समध्ये खासगी कंपनीत नोकरीला आहेत. तर, अशोक त्रिपाठींचा भुवनेश्वरमध्ये व्यवसाय आहे. धनुष आणि रितिका शिकत आहेत.
 
उत्तम सोनावणे पुढे म्हणाले, "वैभवी यांच्या आईची तब्येत बरी नसल्याने त्या सद्यस्थितीत घरातच व्हेन्टिलेटरवर आहेत." वैभवी नेपाळल्या गेल्यानंतर त्यांची बहिण त्यांच्या आईसोबत आहे. वैभवी यांचे कुटुंबीय नेपाळच्या भारतीय दुतावासासोबत संपर्कत आहेत. 
 
ठाण्यातील स्थानिक पत्रकारांनी या इमारतीत जाऊन शेजाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, कोणीच या घटनेबाबत बोलण्यास तयार नाही. ठाण्यातील पत्रकार सांगतात, "या दुर्घटनेमुळे सर्वांना धक्का बसलाय. त्यामुळे शेजारी यावर बोलण्यास तयार नाहीत." वैभवी यांच्या बहिणीनेही आई आजारी असल्याने बोलण्यास नकार दिलाय. 
 
पोलिसांनी या दुर्घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर सोसायटीत जाऊन प्राथमिक माहिती घेतली आहे. पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली आहे.   
 
नेपाळमधील टूर ऑपरेटर काय म्हणाले? वैभवी त्यांची मुलं आणि विभक्त पती नेपाळच्या कैलाश व्हिजन ट्रेक मार्फत फिरायला गेले होते. बीबीसी मराठीने काठमांडूच्या कैलाश व्हिजन ट्रेकचे टूर मॅनेजर सागर आचार्य यांच्याशी संपर्क केला. 
 
ते म्हणाले, "27 मे रोजी माझी त्यांच्याशी काठमांडूमध्ये भेट झाली होती. पोखरापर्यंतचा प्रवास त्यांनी गाडीने केला होता." पोखरामध्ये त्यांच्याशी पुन्हा भेट झाली. नेपाळ टूरबाबत ते सर्व खूप आनंदात होते.
 
कैलाश व्हिजन ट्रेककडून मिळालेल्या माहितीनुसार, जॉमसॉमसाठी रविवारी सकाळी विमान 6.30 वाजता निघणार होतं. पण, हवामान खराब असल्याचे विमानाला उशीर झाला. अखेर ते विमानात बसले आणि त्यांनी मला फोन केला." 
 
ते म्हणाले, "आम्ही विमानात बसलोय. तुम्ही हॉटेलला कळवून ठेवा. तिकडे पोहोचल्यानंतर फोन करतो. त्यांचं हे अखेरचं बोलणं होतं," सागर आचार्य पुढे सांगत होते. 
 
पोखरामध्ये सकाळी हवामान खराब असल्याने विमान उड्डाण उशीरा झालं. पण, परिस्थिती सुधारल्यानंतर पोखरा आणि जॉमसॉम एअरपोर्ट पुन्हा सुरू झाले. त्यांच्या विमानाने टेकऑफ करण्याआधी समिट एअरच्या दोन विमानांनी टेकऑफ केला होता. पाच-सात मिनिटांच्या अंतराने या विमानांनी उड्डाण केलं होतं. 
 
सागर आचार्य पुढे सांगतात, "समिट एअरची दोन्ही विमानं कोणत्याही अडचणीशिवाय जॉमसॉम एअरपोर्टवर सुखरूप उतरली. पण वैभवींचे कुटुंबिय असलेल्या विमानाचाही तिथल्या टॉवरसोबत संपर्क झाला होता. पण, हा संपर्क काही मिनिटातच तुटला." 
 
विमानाचे अवशेष मिळाले 14 मृतदेह सापडले  
दरम्यान, नेपाळच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने तारा एअरवेजच्या बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष मिळाल्याची माहिती बीबीसी नेपाळीशी बोलताना दिली. 
 
NEA चे प्रवक्ते देव चंद्र लाल कर्ना म्हणाले "रविवारपासून संपर्कात नसलेल्या तारा एअरच्या विमानाचा शोध लागलाय. 14 प्रवाशांचे मृतदेह विमान क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आढळून आले आहेत." 
 
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या शोधमोहिम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या माहितीनुसार, फिस्टल एअरच्या हेलिकॉप्टरने दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरचं विमान 14,500 फुटांवर क्रॅश झालंय. तासांग भागातील सानुसरेमध्ये हे विमान आढळून आलंय. 
 
विमान क्रॅश झालेल्या ठिकाणी हेलिकॉप्टर लॅंड झालं असून शोध आणि बचावकार्य युद्धस्तरावर सुरू करण्यात आलं आहे.
 
नेपाळच्या लष्कराचे प्रवक्ते नारायण सिववाल ट्विटरवर लिहीतात, 'लष्करी अधिकारी, पोलीस आणि गाईड विमान क्रॅश झाल्याच्या ठिकाणी पोहोचले आहेत. शोध आणि बचाव मोहिमेतील इतर अधिकारी, कर्मचारी क्रॅश साईटवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.' 
 
तर, तासांग गावपालिकेचे अध्यक्ष दिपक शेरचान बीबीसी नेपाळीला दिलेल्या माहितीत सांगतात, "हे विमान धौलंगिरी पर्वतरांगात क्रॅश झालंय. या ठिकाणी मानवी वस्ती नाही."