शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (11:08 IST)

मुंबईतील सर्व शाळांना मराठी नावाची सक्ती!

mumbai mahapalika
मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक हे मराठी भाषेतून लावण्याचे निर्देश महापालिका शिक्षण विभागाने बजावले आहे. महापालिका मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळांनी दर्शनी भागात शाळेच्या नावाचे नामफलक हे मराठी भाषेत लावणे आणि शाळा महापालिका मान्यताप्राप्त असेल तर ‘बृहन्मुंबई महानगरपालिका मान्यताप्राप्त शाळा’असा नामफलक मराठी भाषेत लावण्याचे निर्देश सर्व भाषिक मनपा मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांचे सचिव तसेच मुख्याध्यापकांना दिले आहेत.
 
 मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना
बृहन्मुंबई महापालिका शिक्षण विभागाने शाळांचे नामफलक मराठीतून लावण्यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकामध्ये यापूर्वी मुंबई महापालिका मान्यताप्राप्त शाळा मंजुरी क्रमांकासह सुयोग्य आकाराचा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत सूचित करण्यात आले होते. या संदर्भात शासनाच्या निर्णयानुसार वेळोवेळी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचनेनुसार शाळांमध्ये लावण्यात आलेले फलक हे मराठी देवनागरी लिपित असणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन तथा मुख्याध्यापक यांनी यासंदर्भात कार्यवाही करावी असे त्यांनी म्हटले आहे.