1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (21:40 IST)

मुंबई विमानतळ 6 तासांसाठी बंद, एकही उड्डाण होणार नाही; काय कारण?

मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळ 17 ऑक्टोबरला 6 तासांसाठी बंद  ठेवण्यात येणार आहे. या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतंही उड्डाण होणार नाही.
 
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळावरील दोन रनवे मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई विमानतळ सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.  मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांच्या देखभालीच्या कामासाठी मंगळवारी 11 ते 5 या वेळेत बंद केलं जाईल, अशी माहिती विमानतळ ऑपरेटरने एका निवेदनात दिली आहे.
 
मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्टीवर देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. विमानतळ ऑपरेटरच्या निवेदनानुसार सांगण्यात आलं आहे की, "छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे  RWY 09/27 आणि RWY 14/32 हे 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 वाजता ते 17:00 वाजेपर्यंत तात्पुरते नॉन-ऑपरेशनल राहतील." निवेदनात पुढे म्हटलं आहे की, "सीएसएमआयए (CSMIA) ने सर्व महत्त्वाच्या विभागांच्या सहकार्याने देखभालीचं काम सुरळीत पूर्ण करणे सुनिश्चित करण्यासाठी प्रभावीपणे उड्डाणे निर्धारित केली आहेत. सीएसएमआयएला प्रवाशांकडून सहकार्य आणि पाठिंबा अपेक्षित आहे."
 
सहा तास एकही विमान उडणार नाही
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 17 ऑक्टोबर रोजी सहा तासांसाठी तात्पुरतं बंद करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळ तात्पुरतं बंद करणे सीएसएमआयएच्‍या वार्षिक प्रतिबंधात्मक देखभालीसाठी आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखण्यासाठी आहे. या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभाल कामे करण्यात येतील. एअरमेनला नोटीस एअरलाइन्स आणि इतर संबंधितांना सहा महिने अगोदर जारी करण्यात आली आहे.