अँटिलिया स्फोटक प्रकरण: बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती
मुंबई उच्च न्यायालयाने अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दिलेल्या जामिनाला अंतरिम स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याप्रकरणी, विशेष न्यायालयाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दिलेल्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. राष्ट्रीय तपास संस्थेने अँटिलिया स्फोटक प्रकरणात विशेष न्यायालयाच्या २९ सप्टेंबरच्या जामीन आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एनआयएच्या अपिलावर सुनावणी करताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने वाझे यांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे. न्यायालयाने राज्य प्रशासनाला आपल्या आदेशाची माहिती तात्काळ संबंधित कारागृह प्रशासनाला देण्याचे निर्देश दिले.
एनआयएचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला की, विशेष न्यायालयाने वाझे यांना जामीन मंजूर करून चूक केली आहे. त्यांनी सांगितले की, समाजात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने उद्योगपतीच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभी करून एका व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप वाझे यांच्यावर आहे. सिंग यांनी विशेष न्यायालयाच्या आदेशातील काही टिप्पणींवरही आक्षेप घेतला. त्यांनी सांगितले की, विशेष न्यायालयाने अंबानी कुटुंबातील सदस्यांचे जबाब न नोंदवल्याबद्दल एनआयएला प्रश्न विचारला होता की, ते यासाठी 'शुभ वेळेची' वाट पाहत होते का?
कथित दहशतवादी धोका असूनही अंबानी कुटुंबाच्या सामान्य जीवनावरही न्यायालयाने भाष्य केले. एनआयएने मुंबई उच्च न्यायालयाला कळवले की, अंबानी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या तीन जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. सिंग यांनी विशेष न्यायालयाची ही टिप्पणी अनावश्यक असल्याचे सांगत फेटाळून लावली.
सचिन वाझे सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहेत; मंगळवारी विशेष न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करूनही त्यांच्या सुटकेची औपचारिकता पूर्ण झाली नव्हती. आता, उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे त्यांची सुटका पुढे ढकलण्यात आली आहे.

