शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (08:34 IST)

मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणासाठी 'अशी' केली आहे तयारी

मुंबई महापालिकेनेही लसीकरणासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मुंबईत केईएम, शीव, नायर, कूपर, वांद्रे भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई, राजावाडी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. या 8 केंद्रातून मुंबईकरांना लस टोचली जाणार आहे. 
 
कोरोनाच्या लसीकरणासाठी पालिका क्षेत्राच्या कृती दलाची म्हणजेच टास्क फोर्सची पहिली बैठक पार पडल्यानंतर लसीकरणासाठीची कार्यवाही जलद गतीने सुरु आहे. प्रारंभी लसीकरणासाठी परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, विलेपार्लेचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही ८ लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. या ठिकाणी रुग्णांना लस टोचली जाणार आहे.
 
मुंबईत नियमित लसीकरण कार्यक्रमांतंर्गत सद्यस्थितीत उपलब्ध असलेली वितरण यंत्रणा कोविड – १९ या लस वितरणासाठी वापरण्यात येईल. तसेच मध्यवर्ती लससाठा शीतगृहापासून लसीकरण केंद्रापर्यंत लस वाहतुकीसाठी पोलिस बंदोबस्त अंतर्गत अतिरिक्त वाहने तैनात करण्यात येणार आहेत. कोविड १९ लसीकरणासाठी कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी केवळ प्रादेशिक लस स्टोअर (आरव्हीएस) म्हणून ओळखली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही कोविड स्टोरेज सुविधा विकसित करण्यात येत असून त्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
 
भारत सरकार आणि PQS Catalogue यांच्या तांत्रिक वैशिट्यानुसार योग्य क्षमतेची दोन वॉक-इन-कूलर संच उपकरणे आणि एक वॉक-इन-फ्रिजर संच उपकरणे खरेदी करण्यात येणार आहे. राज्य सरकारमार्फत २२५ लीटर क्षमतेचे १७ आयएलआर (आईस लाइन्ड रेफ्रिजरेटर)चा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यापैकी ८ आयएलआर नियोजित लसीकरण केंद्रांना (४ वैदयकीय महाविदयालय व ४ उपनगरीय रुग्णालय) देण्यात आले आहेत.