देवेंद्र फडणवीसांना मुंबई पोलिसांची नोटीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे. या नोटिशीनुसार देवेंद्र फडणवीस उद्या 13 मार्च रोजी बीकेसीमधील सायबर गुन्हे शाखेसमोर उपस्थित राहाणार आहेत. महाराष्ट्रात झालेल्या पोलीस अधिकारी बदली घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
या घोटाळ्यासंदर्भातील माहितीचा अहवाल सहा महिने सरकारकडे पडून होता. तो आपल्याकडे आला, ही माहिती केंद्रीय गृहसचिवांकडे पाठवण्यात आली होती अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आपलयाके आलेली माहिती कोठून आली हे न सांगण्याचा विशेषाधिका आपल्याकडे आहे मात्र तरिही मी पोलिसांना मदत करणार आहे असं फडणवीस म्हणाले.
सरकारी वकिलाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हा आरोप करताना त्यांनी 125 तासांच्या स्टिंग ऑपरेशनचे फुटेज विधानसभेत जमा केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील बड्या नेत्यांच्या सांगण्यावरुन हे काम होत असल्याचं फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचं षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला आहे. त्यासाठी त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन सभागृहात सादर केलं.
राज्य सरकारनं केलेल्या षड्यंत्रचा भांडाफोड मी केला म्हणून काही सुचत नसल्यानं त्यांनी मला ही नोटीस दिली असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
CRPC 160 ची नोटीस आहे. बदली घोटाळा मी उघडकीस आणला, त्यासंदर्भात नोटीस आहे. मी गृहमंत्री होतो, पण मी पोलिसांना तपासात सहकार्य करणार, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार. या संदर्भात सीबीआय चौकशी सुरू असून तपासात सत्य समोर येणार असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.