सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (07:27 IST)

मुंबई तब्बल ३० तास पाणीपुरवठा बंद राहणार, वाचा 'हे' आहेत भाग

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या ठिकाणी जलविद्युत स्थानकात काही मोठा तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे मुंबईच्या पाणी पुरवठ्यात अगोदरच १५ टक्के कपात अनिश्चित कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे. आता लोअर परळ भागात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते १५ मार्च दुपारी २ वाजेपर्यंत ३० तासांसाठी दादर, परळ, वरळी, माहिम, माटुंगा, प्रभादेवी आदी भागात तब्बल ३० तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
 
तर जी/दक्षिण विभागातील महालक्ष्मी, धोबीघाट, सातरस्ता, डिलाई रोड परिसरात १५ मार्च रोजी पहाटे ४.०० ते सकाळी ७.०० या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. सदर विभागातील नागरिकांनी जल वाहिनी दुरुस्ती कामाला सुरुवात होण्यापूर्वीच आवश्यक पाण्याचा साठा करुन त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
 
१४ व्या मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी व आता आल्यानंतर मुंबईत पाणी समस्येला तोंड फुटले आहे. त्यामुळे यापुढेही या ना त्या कारणामुळे जर निवडणूक पार पडेपर्यंत पाणीसमस्या कायम राहिल्यास त्याचा मोठा फटका पालिकेत गेली २५ वर्षे सत्ता भोगणार्या शिवसेनेच्या मतपेटीवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
मुंबई महापालिकेतर्फे लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम १४ मार्च रोजी सकाळी ८ ते १५ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत जल अभियंता खात्यामार्फत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत महापालिकेच्या जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर जी/दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
 
खालील भागात ३० तास पाणीपुरवठा बंद
जी/दक्षिण विभाग
 
डिलाई रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग
 
 जी/उत्तर विभाग
 
संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभाग