मुंबईची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार पार
मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी २० हजारांहून दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्यावर मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल असा इशारा दिला होता. तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील रुग्णसंख्या वाढली तर मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल, असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १५ हजार १६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ३३ हजार ६२८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३८४ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५२ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ६१ हजार ९२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत बुधवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आढळलेल्या १५ हजार १६६ रुग्णांपैकी १३ हजार १९५ रुग्ण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत आज दिवसभरात ६० हजार १४ कोरोना चाचण्या झाल्या आहे असून आतापर्यंत १ कोटी ३९ लाख २४ हजार ६०८ चाचण्या झाल्या आहेत. आज दगावलेल्या रुग्णांपैकी २ जणांचा दीर्घकालीन आजार होते. १ रुग्ण पुरुष आणि दोन रुग्ण महिला होत्या. या मृत्यू झालेल्या रुग्णांचे वय ४० ते ६० वर्षांवर होते.
महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईतील रिकव्हरी रेट ९० टक्के असून मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर ८९ दिवस आहे. मुंबईत सीलबंद करण्यात आलेल्या इमारतींची संख्या ४६२ झाली आहे. मुंबईत काल, मंगळवारी १० हजार ८६० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती आणि २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.