सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (08:09 IST)

मुंबईचा विहार तलाव भरून वाहू लागला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक मात्र लहान असलेला विहार तलाव १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे.तत्पूर्वी, तुळशी तलाव हा १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता, पवई तलाव १२ जून रोजी दुपारी ३ वाजता भरून वाहू लागला होता. आता विहार तलावही भरून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बाब सुखावह ठरली आहे. गेल्यावर्षी ५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास विहार तलाव पूर्ण भरून वाहू लागला होता. २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी तर २०१८ मध्‍ये १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.
 
विहार तलावाची पाणी साठवण क्षमता २७,६९८ दशलक्ष लीटर इतकी आहे.मुंबईला मुंबईबाहेरील प्रमुख पाच तलाव आणि मुंबईतील तुळशी व विहार या दोन तलावांमधून अशा एकूण सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लीटर इतक्या पाण्याचा पुरवठा केला जातो. विहार तलावातून मुंबईला दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.