Video बिबट्या घराच्या अंगणात लपून बसला होता, वयस्कर महिलेवर केला हल्ला
मुंबईत आरे कॉलनीत घडलेल्या एका घटनेत घराच्या अंगणात येऊन बसलेल्या बिबट्याने एका वयस्कर महिलेवर हल्ला केला. महिलेने काठीने बिबट्याचा प्रतिकार करत आपला जीव वाचवला.
हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या व्हिडीओत आरे डेअरी परिसरात बिबट्या आल्याचं दिसत आहे. काही वेळाने एक वयस्कर महिला हातात काठी घेऊन चालत येताना दिसते. काही वेळाने महिला तिथे पायरीवर बसते आणि मागे बिबट्या बसला असल्याची त्यांना मुळीच कल्पनाच नसताना बिबट्या महिलेच्या दिशेने येतो आणि काही कळण्याआधीच हल्ला करतो.
या घटनेत महिला हातातल्या काठीने प्रतिकार करताना दिसते. हल्ल्यामुळे महिला खाली पडते आणि बिबट्या जमिनीवर पडलेल्या महिलेवर पुन्हा हल्ला करतो परंतु महिलेचा प्रतिकार पाहता काही वेळाने तो पळ काढतो. या ५५ वर्षीय महिलेचं नाव निर्मला देवी सिंग असे आहे.
बिबट्या गेल्यानंतर महिला आरडाओरडा करते आणि काही लोक मदतीला धावून येतात. या महिलेला किरकोळ जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.