बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (15:40 IST)

मुंबई मेट्रोचे दोन मार्ग येत्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रवासी वाहतुकीकरता सुरू होणार

The Mumbai Metro will have two routes for passenger traffic between December and February Maharashtra News Mumbai News Webdunia Marathi
मुंबईतील मेट्रोचे दोन मार्ग मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ हे पुढील ३ ते ५ महिन्यात म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान प्रवासी वाहतुकीकरता सुरू होणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ने जाहीर केलं आहे. MMRDAचे आयुक्त एस श्रीनिवास यांनी ही माहिती दिली आहे. 
 
मुंबईत मेट्रो ७ ( रेड लाईन ) आणि मेट्रो २ अ ( यल्लो लाईन ) या मेट्रो मार्गांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या चाचण्या विविध पातळीवर अंतिम टप्प्यात आहेत, मेट्रो स्थानकांची कामेही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. 
 
मेट्रो ७ हा मार्ग अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा एकूण १६.४७५ किलोमीटर लांबीचा आहे. या मेट्रो मार्गावर एकूण १३ मेट्रो स्थानके आहेत. अत्यंत वर्दळीच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरून या मेट्रो मार्गाची उभारणी करण्यात आलेली आहे. या मार्गावरून मेट्रो सेवा सुरू झाल्यावर पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सुटेल अशी आशा आहे. तसंच या भागात रहाणाऱ्या लोकांना मेट्रो हा एक जलद प्रवासी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. 
 
तर मेट्रो २ अ हा मार्ग डी एन नगर ते दहिसर असा एकूण १८.५८९ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण १७ मेट्रो स्थानके आहेत. रेल्वे मार्गापासून दूर असलेल्या पश्चिम उपनगरातील लिंक रोडवर या मेट्रो मार्गाची बांधणी करण्यात आलेली आहे. या मेट्रो मार्गामुळे लिंक रोड मार्गावरील मोठ्या लोकसंख्येला लोकल ट्रेनऐवजी मेट्रो हा प्रवासी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.