नालासोपारा : पती आणि सावत्र मुलाने हुंड्यासाठी गरोदर महिलेची केली निर्घृण हत्या, आरोपींना अटक
देशात सध्या हुंडा घेणे आणि देण्यावर कडक कायदा आहे. पण आज देखील हुंड्यासाठी महिलांची बळी दिली जाते. हुंड्यासाठी माणुसकीला काळिमा फासणारी घटना नालासोपाराच्या आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
एका महिलेच्या पतीने सावत्र मुलासह महिलेची निर्घृण हत्या केली. ही महिला आठ महिन्यांची गरोदर होती. महिलेसह तिच्या पोटातील बाळाला देखील मारून टाकले.
लग्न करून देखील पत्नीने हुंडा आणला नाही हा राग पतीच्या मनात खदखदत होता. तो पत्नीला दररोज मारहाण करायचा. 7 एप्रिल 2024 च्या रात्री 8 वाजेच्या सुमारास पती दारू पिऊन आला आणि आपल्या 8 महिन्याच्या गरोदर पत्नीला मारहाण केली. तसेच पतीला साथ महिलेच्या सावत्र मुलाने दिली. त्याने महिलेला बळजबरीने कोणतेतरी औषध पाजले या मुळे तिच्या पोटातील बाळ दगावले. जयप्रकाश अमरनाथ दुबे आणि सचिन जयप्रकाश दुबे असे या आरोपी पिता पुत्राची नावे आहे.
पोटातील बाळाच्या मृत्यूची नोंद 20 एप्रिल 2024 रोजी आचोळे पोलीस ठाण्यात करण्यात आली पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 315,498 (अ),34 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपी पती जयप्रकाश आणि सावत्र मुलगा सचिन ला अटक केली असून न्यायालयात सादर केले. न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला.
महिलेचा रुग्णालयात उपचाराधीन असता 2 जुलै रोजी दुर्देवी मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यू नंतर जयप्रकाश आणि सचिनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.हे दोघे त्यानंतर पसार झाले.
त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आणि सापळा रचून दोन्ही आरोपींना नालासोपारा येथून 16 जुलै रोजी अटक केली. आचोळे पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Edited by - Priya Dixit