1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. Narayan Rane arrives at Balasaheb Thackeray Memorial, will take darshan for the first time

नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर दाखल, पहिल्यांदाच घेणार दर्शन

नारायण राणे आज (19 ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास दिल्लीहून मुंबई येथे दाखल झाले. त्यानंतर अंधेरी परिसरातील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात झाली.
 
राणे यांनी मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर राणे यांची यात्रा मार्गस्थ झाली.
 
राणे यांची जनआशीर्वाद यात्रा यानंतर वांद्रे आणि कलानगरच्या दिशेने जाणार आहे. त्याठिकाणी राणे यांची सभा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेणार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
 
यात्रेदरम्यान, खेरवाडी येथे नारायण राणे यांचं भाषण झालं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह राणे यांचा पोटनिवडणुकीत पराभव करणाऱ्या माजी आमदार तृप्ती सावंत यासुद्धा उपस्थित होत्या.
 
महाराष्ट्रात आमचा जन्म झाला आहे. या भूमीवर फिरण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही दोन वर्षात राज्याला कसं मागे नेलं, हे आम्ही जनआशीर्वाद यात्रेतून लोकांना सांगू, आगामी महापालिका निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवू, असा इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला यावेळी दिला.
पुढील लेख
मुलींच्या रॅगिंगमुळे शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; खून झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप