शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (08:23 IST)

मराठी भाषा गौरव दिनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार गौरव व पुरस्कार प्रदान सोहळा

मुंबई: ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून येत्या रविवारी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा विभागातर्फे सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना गौरव व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
 
यावेळी विंदा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त श्री भारत सासणे यांच्यासह श्री.पु.भागवत पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था  – लोकवाङ्मय गृह, मुंबई, डॉ अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराचे मानकरी (व्यक्ती) – डॉ. रमेश नारायण वरखेडे, नाशिक, कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्काराचे मानकरी (व्यक्ती) – डॉ. चंद्रकांत पाटील, पुणे, कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार मिळालेले (संस्था) – मराठी अभ्यास केंद्र, मुंबई यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
 
या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख,मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  यावेळी चौरंग निर्मित ‘शारदेच्या अंगणी मराठीच्या प्रांगणी’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
 
पुरस्काराचे नाव व पुरस्कारार्थी यांची माहिती खालीलप्रमाणे –
 
1)विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक –भारत सासणे
 
भारत सासणे यांनी कथा, नाटक, एकांकिका, कादंबरी, बालसाहित्य, ललित व श्रुतिका लेखन, चित्रपट पटकथा या वाङ्मय प्रकारात लेखन केले असून त्यांची 35 पुस्तके प्रकाशित आहेत.
श्री. भारत सासणे यांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 7 पुरस्कार व इतर 30 पुरस्कार मिळाले आहेत. मराठवाडा साहित्य संमेलन, सांगली येथे संपन्न झालेल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व जळगांव येथे संपन्न झालेल्या उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
श्री. भारत सासणे यांनी ‘दीर्घकथा’ हा वाङ्मयप्रकार नाविन्यपूर्णतेने व प्रयोगशीलतेने हाताळला आहे.
 
2)श्री.पु.भागवत पुरस्कार प्राप्त प्रकाशन संस्था  – लोकवाङ्मय गृह, मुंबई
 
पुस्तक व्यवसायापुढची सगळी आव्हाने पेलून सदैव पुरोगामी विचारांशी बांधिलकी बाळगणाऱ्या लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने समाजाला नवी दृष्टी देणारे वाङ्मय सातत्याने प्रकाशित केले आहे.
‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बृहद चरित्र’, नेमाडे यांच्या मुलाखतींचा संग्रह, अशोक केळकरांचा ‘रुजुवात’ हा मराठी समीक्षेचा मानदंड, सतीश काळसेकर यांचे कसदार साहित्य, दहा निवडक लेखकांच्या साहित्याची संपादित ‘निवडक साहित्यमाला’, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र-चरित्र, अशोक शहाणे, अरुण खोपकर, अरुण काळे, प्रतिमा जोशी, जयंत पवार, मनोहर ओक, नीतिन रिंढे, अशा नव्या वळणाच्या प्रयोगशील लेखकांच्या साहित्याने लोकवाङ्मयची सूची उजळून निघाली आहे.
नवीन लेखक / कवींना पुढे आणण्यासाठी कविसंमेलने, विविध लेखनविषयक स्पर्धा, आपले वाङ्मय वृत्त या मासिकाद्वारे साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक परिघावरील लिखाणाला चालना देण्याचे काम लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेने केले आहे.
वि.पु. भागवत पुरस्कारासह मराठी विज्ञान परिषद, फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संघ या संस्थांचे पुरस्कार लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेस प्राप्त झाले आहेत.
लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेची गेल्या पन्नास वर्षांतील तेराशे पुस्तकांची भरघोस निर्मिती मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात मौलिक स्वरुपाची भर घालणारी आहे.
3) डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (व्यक्ती) – डॉ. रमेश नारायण वरखेडे, नाशिक
 
‘अनुष्टुभ’ या मराठी साहित्य आणि समीक्षाव्यवहारात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक.
पुणे विद्यापीठात व्यावहारिक मराठीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात तसेच पाठ्यपुस्तक निर्मितीतही पुढाकार.
का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्र धुळे येथे कार्यरत असताना खानदेशातील भिलोरी, पावरा, बंजारा, अहिराणी या बोलींचा भाषिक आणि लोकसांस्कृतिक अभ्यास करण्यासाठी पद्धतिशास्त्र विकसित केले. तसेच ह्या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना उपयुक्त असे ‘समाजभाषाविज्ञान:प्रमुख संकल्पना’ हे पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित.
19वर्षे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अनुदेशन तंत्रविज्ञानाचे प्राध्यापक आणि मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेचे संचालक म्हणून कार्यरत. स्वयं-अध्ययनपर पुस्तकांची निर्मिती. ग्रंथालयशास्त्र, वृत्तपत्रविद्या, मानवी हक्क, ग्राहक संरक्षण, पंचायतराज, सामाजिक परिवर्तने आणि चळवळी असे अनेक नवे अभ्यासक्रम विकसित करून त्यांची परिभाषा तयार केली.
निवृत्तीनंतर नाशिक येथे इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज इंजिनिअरिंग या संस्थेचे अध्यक्ष आणि ‘क्रिटिकल इन्क्वायरी’ या द्वैभाषिक संशोधन-पत्रिकेचे आठ वर्षे संपादन.
4) डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्था) – मराठी अभ्यास परिषद, पुणे
 
मराठी भाषेचा सर्वांगीण विकास, लोकव्यवहारात मराठीचा वापर, ज्ञानव्यवहारात मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे आणि मराठीजनांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे या चतु:सूत्रीनुसार मराठी भाषेच्या हिताच्या आणि समृद्धीच्या दृष्टीने ही संस्था चाळीस वर्षे सातत्याने कार्यरत
भाषाविषयक सैद्धान्तिक विचारविमर्श, भाषांतरित साहित्याची चिकित्सा तसेच भाषा आणि जीवन यातील विविधपदरी संबंध आणि त्यावरचे भाष्य मांडणारे भाषा या विषयाला वाहिलेले ‘भाषा आणि जीवन’ हे त्रैमासिक 1983पासून आजतागायत सुमारे चाळीस वर्षे प्रकाशित होणारे केवळ मराठीच नव्हे तर
सकल भारतीय भाषांमधले हे एकमेव भाषाशास्त्रीय नियतकालिक.
कोश, बोलीभाषा, अन्य भाषारूपे यांचा अभ्यास, भाषा आणि संस्कृती यांसंबंधी लेखन आणि लेखक यांना पुरस्कार.2018पासून या पुरस्काराचे नामकरण ‘प्राध्यापक ना. गो. कालेलकर पुरस्कार’.
वर्धापनदिनानिमित्त व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद तसेच मराठी भाषा दिनानिमित्त ‘भाषातज्ज्ञ श्रीमती सत्त्वशीला सामंत स्मृतिव्याख्यान’ इ. उपक्रम.
त्रिभाषा-सूत्राचे मूल्यमापन, भाषिक नीती आणि व्यवहार, प्रसार माध्यमे आणि मराठीचा विकास, पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन आदी विषयांवर सकारात्मक मंथन.
5) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (व्यक्ती) – डॉ. चंद्रकांत पाटील, पुणे
 
कवी, समीक्षक, अनुवादक, अनेक बहुचर्चित मराठी आणि हिंदी कवितासंग्रहांचे संपादक तसेच राष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याचे मोलाचे कार्य
१९६६ साली भालचंद्र नेमाडे यांच्यासह ‘वाचा’ या लघुनियतकालिकाचे प्रकाशन.
हिंदी साहित्याचा मराठी अनुवाद आणि मराठी साहित्याचा हिंदी अनुवाद करण्याचे कार्य.
दोन हजारहून अधिक कवितांचा अनुवाद, कविता-नाटक-कादंबरी यांच्या अनुवादांचे ४० संग्रह, १० संपादित ग्रंथ, ५ कवितासंग्रह, ५ लेखसंग्रह अशी ग्रंथसंपदा.
गेली सात वर्षे ज्ञानपीठ पुरस्कारासाठीच्या अंतिम निवडसमितीत परीक्षक तसेच मध्यप्रदेश सरकारचा कबीर सन्मान, कुसुमांजली राष्ट्रीय पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार यांसह अनेक राष्ट्रीय वा राज्यस्तरीय पुरस्कार समित्यांत परीक्षक म्हणून कार्य.
महाराष्ट्र शासनाच्या चार पुरस्कारांसह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांचे पुरस्कार, विविध राष्ट्रीय पुरस्कार आणि अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार.
5) कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्था) – मराठी अभ्यास केंद्र, मुंबई
 
मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन.
शालेय शिक्षणात येणारे मराठी भाषेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करून राज्य शासनाला द्विस्तरीय आराखडा सादर.
‘उच्च शिक्षणाची दशा आणि दिशा’ हा उच्च शिक्षणात मराठीच्या वापरासंबंधी लक्ष वेधणारा अभ्यासग्रंथ प्रकाशित. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर सर्वत्र मराठी माध्यम उपलब्ध व्हावे यासाठी पाठपुरावा. त्यातून मुंबई विद्यापीठाच्या ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ अभ्यासक्रमांचे मराठीकरण.
न्यायव्यवहारात मराठीचा वापर व्हावा यासाठी ‘न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ ह्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन करून जिल्हा व तालुका न्यायालय वकील परिषदेत त्याचे वितरण तसेच या संदर्भातीस चर्चासत्रांचे आयोजन.
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात मराठीचा वापर वाढावा यासाठी संगणकीय मराठीच्या वापराबद्दल कार्यशाळा. राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक संगणकात मराठीचा वापर अनिवार्य होण्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. मराठीसाठी इन्स्क्रिप्ट फलक सर्वमान्य व्हावा, एमएससीआयटी अभ्यासक्रमात युनिकोड व मराठीचा समावेश व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा. त्या संबंधित पुस्तिका प्रकाशित.