सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची अधिकऱ्याला जबर मारहाण
भिवंडीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची वर्गणी गोळा करणारे कार्यकर्ते केंद्रीय गुप्तवार्ता विभागातील निरीक्षक अधिकाऱ्याकडे गेले असता त्याने वर्गणी देण्यास नकार दिला. हा राग मनात ठेऊन त्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याची घटना घडली. संबंधित व्यक्ती हा केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या निरीक्षक पदावर कार्यरत असून त्याच्या कार्यालयात ही मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे भिवंडी टेमघर येथील एका इमारतीत कार्यालय आहे. दहीहंडी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिवंडी शहरात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवून असलेले केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे निरीक्षक कुंदनसिंग रावत हे कार्यालयात बसून काम करीत असताना त्या ठिकाणी टेमघर परिसरातील साईश्रद्धा मित्र मंडळाचे कार्यकर्ते वर्गणी मागण्यासाठी दुपारी एक वाजता आले. ते जबरदस्तीने वर्गणीची मागणी करू लागले असता वर्गणी देण्यास त्या अधिकाऱ्याने नकार दिला. त्यानंतर त्या कार्यकर्त्यानी कुंदनसिंग रावत यांना हाताचे ठोश्याने तोंडावर आणि अंगावर ठिकठिकाणी मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने हाताच्या दंडाने फिर्यादीचा गळा आवळून त्याला बेशुध्द करून पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी प्रथम शासकीय आणि त्यानंतर ठाणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. शांतीनगर पोलिसांनी तातडीने शोध घेऊन मंडळाचे पदाधिकारी विश्वनाथ बाळाराम पाटील (वय 36), प्रतिक विलास बोरसे (वय 26), सुनिल राधाकिशन राहुलवार (वय 33), जतिशर मेशफुलोरे (वय 27), सागर पंढरीनाथ पाटील (वय 25) यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.