मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाने समन्स

Rohit Pawar summons to Mumbai High Court
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाने समन्स बजावले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान रोहित पवारांनी भ्रष्ट मार्गांचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदेंनी कोर्टात दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान, रोहित पवार यांना समन्स बजावत त्यांना बाजू मांडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. आपली बाजू मांडण्यासाठी रोहित पवार यांना १३ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
 
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित यांच्याविरोधात पराभूत झालेल्या राम शिंदेंनी याचिकेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात रोहित पवार यांनी त्यांच्या साखर कारखान्यातल्या १०० कर्मचार्‍यांच्या वापर करुन पैशांचे वाटप केले. त्यापैकी अनेक कर्मचार्‍यांना आपण रंगेहात पकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकार्‍यांच्या ताब्यात दिले होते, असे राम शिंदेंनी याचिकेत नमूद केले आहे.
 
व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित केल्याचा आरोपदेखील राम शिंदे यांनी केलाआहे. विशेष म्हणजे या याचिकेत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचादेखील उल्लेख आहे.